ॲप डाऊनलोड केले आणि २२ लाख गमावले
By रोशन मोरे | Published: October 18, 2023 06:40 PM2023-10-18T18:40:49+5:302023-10-18T18:41:01+5:30
नागरिकाच्या नावे परस्पर २० लाख रुपये कर्ज घेण्यात आले
पिंपरी : व्हॉट्सअपवर पाठवलेल्या लिंकद्वारे ॲप डाऊनलोड झाले. या ॲपच्या माध्यमातून ४४ वर्षीय नागरिकाच्या खात्यातील दोन लाख ८८ हजार रुपये काढून घेण्यात आले. तसेच नागरिकाच्या नावे परस्पर २० लाख रुपये कर्ज घेण्यात आले. ही घटना आठ ऑक्टोबरला उद्यमनगर, पिंपरी येथे घडली. या प्रकरणी अनिश पद्मनाथ करंदीकर (वय ४४, रा.उद्यमनगर, पिंपरी) यांनी मंगळवारी (दि.१७) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिश यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर एका अनओळखी क्रमांकावरून लिंक पाठवण्यात आली. या लिंकवर अनिश यांनी क्लिक केले असता एक ॲप त्यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाले. तसेच अनिश यांना एका व्यक्तीचा मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांना ॲपमध्ये सर्व माहिती भरण्यास सांगितले. मात्र, अनिश यांनी तसे करण्यास नकार दिला. मात्र, तरी देखील या ॲपद्वारे अनिश यांच्या नावे २० लाख ६५ हजार रुपयांचे कर्ज काढून ते त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. अनिश यांच्या बँक खात्यात कर्ज जमा झाल्याचा मेसेज येताच अवघ्या काही मिनिटांमध्ये ते कर्ज परस्पर काढून घेण्यात आले. तसेच अनिश यांच्या खात्यात असलेले दोन लाख ८८ हजार ७९६ रुपये काढून घेत फसवणूक करण्यात आली.