डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घरात राहूनच साजरी करावी : पिंपरी-चिंचवडच्या महापौरांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 08:58 PM2020-04-08T20:58:48+5:302020-04-08T20:59:19+5:30

शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या सर्व आदेश आणि सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा..

Dr. Babasaheb Ambedkar's birth anniversary should be celebrated in a simple way from home : Pimpri-Chinchwad mayor's appeal | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घरात राहूनच साजरी करावी : पिंपरी-चिंचवडच्या महापौरांचे आवाहन 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घरात राहूनच साजरी करावी : पिंपरी-चिंचवडच्या महापौरांचे आवाहन 

googlenewsNext
ठळक मुद्दे शहरातील विविध पक्षांच्या शिष्टमंडळाने महापौर उषा ढोरे यांची घेतली भेट

पिंपरी : कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या सर्व आदेश आणि सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी कोणीही घराबाहेर न पडता, घरात राहूनच अभिवादन करावे, असे आवाहन महापौर ऊषा ढोरे यांनी केले.
कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्यावतीने लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन या काळात करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर पिंंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दि. ११ ते १४ एप्रिल या दरम्यान
साजरा होणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सर्व कार्यक्रम कोरोना विषाणू संसर्गाचा धोका पूर्णत:टळल्यानंतर यावर्षी योग्य वेळ निश्चित करून आगामी कालावधीत घेण्यात येणार आहे.
महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या प्रबोधन पर्वाच्या आयोजनासंदर्भात आज शहरातील विविध पक्षांच्या शिष्टमंडळाने महापौर उषा ढोरे यांची भेट घेतली. त्यानंतर महापौर ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या शिष्टमंडळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या राज्य सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब रोकडे, दशरथ ठाणांबीर, एमआयएमचे प्रवक्ते धम्मराज साळवे, भीमशाही संघटनेचे शिवशंकर उबाळे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे गिरीश वाघमारे, समता सैनिक दलाचे मनोज गरबडे, स्वराज प्रतिष्ठानचे बापूसाहेब वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते प्रदोष जाधव आदी उपस्थित होते. 

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar's birth anniversary should be celebrated in a simple way from home : Pimpri-Chinchwad mayor's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.