प्रारूप मतदारयादी झाली प्रसिद्ध
By admin | Published: July 2, 2017 02:30 AM2017-07-02T02:30:58+5:302017-07-02T02:30:58+5:30
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची सन २०१७ ची प्रारूप मतदारयादी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव यांच्या स्वाक्षरीने शनिवारी प्रसिद्ध करण्यात आली
लोकमत न्यूज नेटवर्क
देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची सन २०१७ ची प्रारूप मतदारयादी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव यांच्या स्वाक्षरीने शनिवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंटच्या सात वॉर्डात एकूण २३ हजार ५८३ मतदार असून यात १२ हजार ४० पुरुष मतदार असून ११ हजार ५४३ महिला मतदार आहेत. वॉर्ड क्रमांक तीनमध्ये शून्य मतदार दाखविले असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांची नावे मतदारयादीत समाविष्ट न केल्याने १२ हजार २२८ मतदार कमी झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
कॅन्टोन्मेंट निवडणूक कायदा २००७ च्या कलम दहा अन्वये देशातील सर्व ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डात दर वर्षी मतदारयादी तयार करण्यात येते. त्यानुसार देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने १९ एप्रिल २०१७ पासून हद्दीतील सात वॉर्डातील मतदारयादी तयार करणेसाठी एकूण ५९ शिक्षक प्रगणकांची नेमणूक केली होती. या प्रगणकांनी मतदारांच्या घरोघरी प्रत्यक्ष जाऊन कायद्यानुसार बोर्डाने दिलेला ठराविक नमुन्यातील अर्ज प्रत्येक कुटुंबप्रमुखाकडून सहीनिशी भरून घेण्यात आला आहे. १ मार्च २०१७ रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण असणाऱ्या व बोर्डाच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांची नावे मतदार यादीत समविष्ट करण्यात आली आहेत. मतदारयादी बनविताना व्यक्तीचे नाव, १ मार्च २०१७ रोजीचे वय, पूर्ण पत्ता, (घर क्रमांकासह), अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती याबाबत माहिती घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
कॅन्टोन्मेंट निवडणूक नियमांतील तरतुदीनुसार शनिवारी एक जुलैला वॉर्डनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारयादी मराठी व इंग्रजी भाषेत असून पाहण्यासाठी बोर्डाच्या कार्यालयात येत्या वीस जुलैपर्यंत उपलब्ध आहे. यादीत सात वॉर्डांत एकूण २३ हजार ५८३ मतदारांची नावे आहेत. वॉर्ड क्रमांक सहामध्ये (चिंचोली-दत्तनगर) सर्वाधिक ४ हजार ८४९ मतदारांची नावे आहेत. तर वॉर्ड क्रमांक सातमध्ये (किन्हई - झेंडेमळा) सर्वात कमी २ हजार ४४० मतदारांची नावे दिसत आहेत. तसेच सात वॉर्डांत अनुसूचित जातीतील (एससी) एकूण ३ हजार ४९६ मतदार असून अनुसूचित जमातीतील (एसटी) एकूण ४०५ मतदार दिसत आहेत. प्रामुख्याने वॉर्ड क्रमांक सहामध्ये अनुसूचित जाती-जमातीचे सर्वाधिक अकराशे अडतीस मतदार दिसत आहेत.
हरकती : वीस जुलैपर्यंत मुदत
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरिकांना ही मतदारयादी पाहण्यासाठी कॅन्टोन्मेंट कार्यालयात कामकाजाच्या दिवशी सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत उपलब्ध राहणार आहे. वीस जुलैपर्यंत नाव व पत्त्यात दुरुस्ती, नवीन नावे समाविष्ठ करणे, यादीतील नावांबद्दल हरकती व दावे विहित नमुन्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दाखल करता येणार असून त्यावरील सुनावणी येत्या अठरा आॅगष्टपासून होणार आहे़ त्यांनतर कॅन्टोन्मेंट कायद्यानुसार अंतिम मतदारयादी येत्या पंधरा सप्टेंबरला प्रसिद्ध होणार असल्याचे कार्यालय अधीक्षक श्रीरंग सावंत यांनी सांगितले आहे.
मतदारयादीतून १२ हजार २२८ मतदार झाले कमी
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पंचमढी (मध्य प्रदेश) कॅन्टोन्मेंट संबंधित एका खटल्यासंदर्भात दिलेल्या निर्णयानुसार दिल्लीतील रक्षा महासंचालकांच्या आदेशानुसार संरक्षण विभागाच्या व सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांचा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मतदारयादीत समावेश करण्यात आलेला नसल्याने गेल्या वर्षी जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीतून १२ हजार २२८ मतदार कमी झाले असल्याचे दिसत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाची मतदारयादी बनविताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील संरक्षण खात्याच्या ए १, ए २, बी १ , बी २ , बी ३, बी ४ तसेच सी या लष्करी वर्गीकरणाच्या जागांवर अतिक्रमण करून घरे बांधून राहणाऱ्या संबंधित मतदारांची नावे मतदारयादीत घेण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
वॉर्डनिहाय अंतिम मतदार २०१६
ही मतदार यादी तुलनात्मक माहितीसाठी पाठविली आहे.
प्रभाग क्रमांक एक - ४१५०
प्रभाग क्रमांक दोन - ५१९७
प्रभाग क्रमांक तीन - ५१९०
प्रभाग क्रमांक चार - ७१५३
प्रभाग क्रमांक पाच - ४७६९
प्रभाग क्रमांक सहा - ४६३७
प्रभाग क्रमांक सात - ४७१५
एकूण मतदारसंख्या — ३५८११
प्रारूप मतदार यादी २०१७
वॉर्ड क्रमांक एक - ४२६४
वॉर्ड क्रमांक दोन - ४००१
वॉर्ड क्रमांक तीन - ००००
वॉर्ड क्रमांक चार - ३३२१
वॉर्ड क्रमांक पाच - ४७०८
वॉर्ड क्रमांक सहा - ४८४९
वॉर्ड क्रमांक सात - २४४०
एकूण मतदारसंख्या - २३५८३