नाट्य संमेलन पिंपरी-चिंचवडला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 02:38 AM2018-11-25T02:38:32+5:302018-11-25T02:38:36+5:30

उद्योगनगरीतून नियामक मंडळाकडे प्रस्ताव : निवडणुकीतील राजकारणाच्या पडसादाची चिन्हे

Drama convention Pimpri-Chinchwadla? | नाट्य संमेलन पिंपरी-चिंचवडला?

नाट्य संमेलन पिंपरी-चिंचवडला?

Next

- विश्वास मोरे

पिंपरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने होणाऱ्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी यांची निवड झाली असून, नागपूर, लातूर आणि पिंपरी-चिंचवडने संमेलनासाठी मागणी केली आहे. मात्र, नियामक मंडळाच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीतील राजकारणाचे पडसाद संमेलनावर पडणार असल्याची चिन्हे दिसत असून, पिंपरी-चिंचवडकरांची नाट्य संमेलनाची मागणी पूर्ण होणार की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. संमेलनस्थळाचे नाव गुलदस्तात आहे.


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाची निवडणूक मार्च महिन्यात झाली होती. त्या वेळी नाट्यनिर्माते प्रसाद कांबळे विरुद्ध डॉ. अमोल कोल्हे असे पॅनेल रिंगणात उतरले होते. रंगकर्मीच्या आखाड्यात राष्टÑवादी, शिवसेना आणि भाजपाही अप्रत्यक्षपणे उतरली होती. डॉ. कोल्हेंच्या मागे तत्कालीन उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी आपली शक्ती लावली होती. मात्र, ऐनवेळी राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी जातीने लक्ष घातल्याने डॉ. कोल्हे पॅनेलचा धुव्वा उडाला होता. राष्टÑवादीत असूनही भोईरांचा पराभव झाला होता. कोल्हेंवर कांबळे यांनी मात केली होती.


दरम्यान, या वर्षीच्या नाट्य संमेलन अध्यक्षपद निवडणूक आणि संमेलन स्थळाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. अध्यक्षपदासाठी गज्वी यांच्यासह अशोक समेळ, श्रीनिवास भणगे आणि मावळातील सुरेश साखवळकर यांचे अर्ज आले होते. शुक्रवारी गज्वी यांची निवड जाहीर करण्यात आली.


शहरामध्ये ६९ वे अखिल भारतीय नाट्य संमेलन झाले होते. प्रा. रामकृष्ण मोरे आणि नाट्य परिषदेने त्याचे यजमानपद स्वीकारले होते. त्याचे अध्यक्ष डॉ. बाळ भालेराव हे होते. त्यानंतर २०१६ मध्ये शहरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. डॉ. डी. वाय़ पाटील विद्यापीठाचे प्रमुख आणि स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी अभूतपूर्व असे संमेलन केले होते. त्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये होणाºया ९९ व्या नाट्य संमेलनासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने पत्र दिले आहे.

राजकारणाचा साखवळकरांना फटका
पुणे परिसरात प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीसाठी सुरेश साखवळकर यांनी काम केले आहे. मावळात त्यांनी कला आणि रंगभूमीसाठी योगदान दिले आहे. गेल्या वर्षीही पिंपरी-चिंचवडकरांनी पुणेकरांनी त्यांचे नाव लावून धरले होते. मात्र, यावर्षी नाट्य परिषदेवर मुंबईकरांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यामुळेच पुण्यातील कलावंताला डावलले असावे, नाट्य क्षेत्रातील अंतर्गत कुरघोड्यांचा फटका त्यांना बसल्याची नाट्य वर्तुळात चर्चा आहे.
 

पिंपरी-चिंचवडमध्ये १९९९ साली नाट्य संमेलन झाले होते. ते शहराने यशस्वी केले होते. त्यानंतर २०१९ मध्ये पिंपरीत नाट्य संमेलन व्हावे, यासाठी पत्र दिले आहे. नाट्य रसिकांच्या मागणीचा विचार केला जावा. कलाक्षेत्रात कोणतेही राजकारण होणार नाही. एवढीच अपेक्षा आम्ही करतो.
- भाऊसाहेब भोईर, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा

Web Title: Drama convention Pimpri-Chinchwadla?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.