Pune Crime | काळेवाडीत गाडीच्या काचा फोडून चालकाला लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 18:59 IST2022-03-23T18:56:40+5:302022-03-23T18:59:55+5:30
ही घटना रात्री साडेबाराच्या सुमारास घडली...

Pune Crime | काळेवाडीत गाडीच्या काचा फोडून चालकाला लुटले
पिंपरी : ट्रकच्या काचा फोडून ट्रकचालकाकडील सात हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. तसेच तलवार फिरवत दहशत निर्माण केली. काळेवाडी येथे मंगळवारी (दि. २२) रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
ऋषिकेश महादेव चव्हाण (वय २६, रा. ज्ञानदीप कॉलनी, थेरगाव) आणि शुभम शांताराम दुबे (वय २१, रा. सुंदर कॉलनी, थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच त्यांचे इतर दोन साथीदार यांच्या विरोधातही जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सुरेश ईश्वर चव्हाण (वय ३८, रा. मु. शिवडे, पो. उंब्रज, ता. कराड, जि. सातारा) यांनी मंगळवारी (दि. २२) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास फिर्यादी ट्रक घेऊन जात होते. ते काळेवाडी येथील धनगर बाबा मंदिराजवळ आले असता चार आरोपींनी त्यांचा ट्रक रस्त्यात अडवला. ट्रकच्या काचा फोडून केबिनमध्ये आले. शस्त्राचा धाक दाखवून त्यांनी फिर्यादीचा सात हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि पाचशे रुपये रोख, असा ऐवज हिसकावून घेतला. तसेच ट्रकच्या काचा फोडून दोन हजार रुपयांचे नुकसान केले. त्यानंतर आरोपी तलवार फिरवत दहशत निर्माण करून निघून गेले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी जाधव तपास करीत आहेत.