Pimpri Chinchwad: वाहनचालकांनो, अति घाई जीव घेई; पिंपरीत अपघातामध्ये दररोज एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 11:27 AM2022-07-21T11:27:21+5:302022-07-21T11:27:34+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते प्रशस्त असले तरी बेशिस्त वाहनचालकांची संख्याही मोठी
पिंपरी : वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात असले तरी अनेक वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करतात. हेल्मेट, सीट बेल्टचा वापर करीत नाहीत. परिणामी अपघात झाल्यास जीवितहानी होते. त्यात पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची भर पडली. गेल्या महिन्यात जूनमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत ३० प्राणांतिक अपघातांच्या घटना घडल्या. अपघातात दररोज एकाचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते प्रशस्त असले तरी बेशिस्त वाहनचालकांची संख्याही मोठी आहे. त्यांच्याकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. परिणामी वाहनांचा खोळंबा होणे, वाहतूक कोंडी होणे असे प्रकार घडतात. वाहतूक पोलिसांकडून काही ठिकाणी नियमन केले जाते. तरीही काही वाहनचालक त्यांना जुमानत नाहीत. दंड भरीन पण बेशिस्तपणेच वाहन चालविन, अशी त्यांची भूमिका असल्याचे दिसून येते.
चाकण-तळेगाव, पुणे-नाशिक महामार्ग धोक्याचा
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत तळेगाव दाभाडे-चाकण-शिक्रापूर हा मार्ग धोकादायक आहे. एमआयडीसीतील अवजड वाहनांची संख्या मोठी आहे. मात्र, त्या तुलनेने रस्ता अरुंद आहे. परिणामी सातत्याने वाहतूक कोंडी होऊन अपघातांचे प्रमाण वाढत आहे. तसेच पुणे -नाशिक महामार्गावर कासारवाडी येथील नाशिक फाटा ते चाकणदरम्यान रस्ता अरुंद आहे, तसेच मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ आहे. त्यामुळे या मार्गावरही अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागत आहे.
रस्ते चकाचक झाल्याने वाढला वेग
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते प्रशस्त आहेत. त्यामुळे शहराच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत केवळ १५ ते २० मिनिटांत पोहोचणे सहज शक्य झाले आहे. असे असतानाही काही वाहनचालक अतिवेगात वाहन चालवितात. असेच प्रकार पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आढळून येतात. वाहनचालक वेगात वाहन चालवून चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात. यात अपघात होतात.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत दाखल गुन्हे
महिना - प्राणांतिक अपघात
जानेवारी - २७
फेब्रुवारी - ३७
मार्च - १६
एप्रिल - २७
मे - २५
जून - ३०