वाहनचालकांच्या बेशिस्तीला चाप
By admin | Published: August 27, 2015 04:49 AM2015-08-27T04:49:39+5:302015-08-27T04:49:39+5:30
चौकात वाहतूक पोलीस दिसत नाही, याचा गैरफायदा उठवायचा. सिग्नल तोडून जायचे, हा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये सर्रास पाहावयास मिळतो.
पिंपरी : चौकात वाहतूक पोलीस दिसत नाही, याचा गैरफायदा उठवायचा. सिग्नल तोडून जायचे, हा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये सर्रास पाहावयास मिळतो.
पिंपरीतील चौकात सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा कार्यान्वित झाल्याने २२८ जणांना दंडाच्या नोटीस घरपोच झाल्या, हे माहीत असूनही बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्याच चौकात वाहतूक पोलीस, वॉर्डन असतानाही अर्ध्या तासात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे अनेक महाभाग आढळून आले. त्यांच्याकडून शंभर रुपये दंडाच्या पावत्या फाडण्यात आल्या. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात वाहतूक बेटाला वळसा घालून वाहने न्यावीत, असे सूचित करणारी चिन्हे लावण्यात आली आहेत. एवढेच नव्हे, तर वाहतूक बेटाला वळसा घालूनच पुढे जावे, असे सांगणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनकडे दुर्लक्ष करीत, सवयीप्रमाणे मनमानी पद्धतीने वाहने पुढे नेणाऱ्यांना गणवेशधारी वाहतूक पोलिसांनी हटकले, तरी नियमांचे उल्लंघन करून वाहनचालकांनी बेशिस्तीचा कळस गाठला. पिंपरी विभाग वाहतूक पोलीस शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले.
वॉर्डन आणि पोलीस कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करून पुढे येणाऱ्या वाहनचालकांना अडविले. त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. वाहतूक पोलीस कर्मचारी सूचना देत असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चांगलेच सुनावले. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता पावत्या फाडून प्रत्येकाकडून दंड वसूल केला. वाहतूक नियम पाळण्याची शिस्त लावून घ्या. स्वयंशिस्त पाळा अशा शब्दांत त्यांना सुनावले. ५० (प्रतिनिधी)