ड्रायव्हिंग स्कूलचे चालक, एजंट घेतात वाहन चालवण्याची चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 06:03 PM2023-12-05T18:03:22+5:302023-12-05T18:03:52+5:30
आरटीओ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत चालतोय ‘कारभार’
पिंपरी : पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) महालक्ष्मी ट्रॅफिक पार्कमध्ये आरटीओच्या अनुपस्थितीत मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे चालक, एजंट उमेदवारांची वाहन चालवण्याची चाचणी घेत असल्याचे उघड झाले आहे. यावरून आरटीओच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असून यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. बहुतांश अपघात मानवी चुकांमुळे होतात. काही अपघातात चालक नवीन असल्याचे उघड झाले आहे. अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी ‘रस्ते सुरक्षा अभियाना’ सारख्या विविध उपाययोजना आरटीओकडून केल्या जात आहेत. पण, ज्या आरटीओला वाहन चालवण्याचा परवाना देण्याचा अधिकार आहे, ते अधिकारी परवाना देताना हलगर्जीपणा करताना दिसून येत आहे.
‘लोकमत’ला काय दिसले..?
१. पिंपरीतील आरटीओकडे दररोज सरासरी २५० हून अधिक चारचाकी तर ३०० हून अधिक दुचाकीस्वारांची चाचणी होते. सोमवारी पिंपरी-चिंचवड आरटीओच्या महालक्ष्मी ट्रॅफिक पार्कमध्ये मोटर वाहन निरीक्षक मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या चालकांनाच ‘टेस्ट’ घेण्यास सांगून निघून गेले !
२. काही वेळ मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे चालक उमेदवारांची चढावर गाडी घेऊन जाणे आणि रिव्हर्स घेऊन येणे, ही चाचणी घेऊन त्यांना पास असल्याचे सांगत होते. काही वेळानंतर संबंधित अधिकारी आल्यावर चाचणी झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे त्यांना सही करण्यासाठी देण्यात आली. एजंट आणि ड्रायव्हिंग स्कूलकडून आलेल्या कागपत्रांवर पास असल्याचे शेरे आणि सह्या प्राधान्याने देण्यात आल्या.
हे आहेत प्रश्न
१. आरटीओ कार्यालय शासकीय अधिकारी, कर्मचारी चालवतात की एजंट?
२. सर्वसामान्य नागरिकांना वेगळा न्याय आणि ड्रायव्हिंग स्कूल चालकांना वेगळा न्याय का?
३. अधिकाऱ्यांकडून ड्रायव्हिंग स्कूल चालकांना इतकी सवलत का?
४. ड्रायव्हिंग स्कूल चालकांना टेस्ट घेण्याचा अधिकार आहे का? तो कोणी दिला?