खोलीचा अंदाज न आल्याने बुडाला; मित्रांनी आरडाओरडा केला तोपर्यंत वेळ निघून गेली, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 07:04 PM2024-05-24T19:04:50+5:302024-05-24T19:05:51+5:30
पोहण्यासाठी तळ्याच्या पाण्यात उतरू नये, आपला जीव महत्त्वाचा असून घरी कोणीतरी वाट पाहतंय याची जाणीव ठेवावी
तळेगाव दाभाडे: पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तळ्यातील पाण्यात बुडून एका महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी(दि.२३) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.अनिकेत घन:श्याम तिवारी(वय १८, सद्या रा. मंत्रा सिटी, तळेगाव दाभाडे, मूळ रा. अभनपूर - रायपूर, छत्तीसगढ) असे मृताचे नाव आहे. तो तळेगाव दाभाडे जवळील आंबी येथील डी. वाय. कॉलेजमध्ये आर्किटेक्चरच्या पहिल्या वर्गात शिकत होता. तो गुणी व हुशार होता.
घटनेची माहिती समजतात वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध मोहीम हाती घेतली. मात्र अंधार पडल्याने गुरुवारी रात्री ७.३०च्या सुमारास ही शोध मोहीम थांबविण्यात आली. शुक्रवारी(दि .२४)सकाळी ६.३०च्या सुमारास शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली.
सुमारे सव्वा तासाच्या अथक प्रयत्नानंतर ७.४५च्या सुमारास अनिकेतचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात शोध पथकास यश आले. मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत आणि त्याचे तीन चार मित्र तळ्याकाठी फिरण्यासाठी गेले होते. त्यातील काहींना पाण्यात उतरण्याचा मोह झाला. अनिकेतला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. मित्रांनी आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उन्मेश गुट्टे यांनी शिवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
तळ्यातील पाणी खोल आहे. पर्यटकांनी आतताईपणा करू नये. पोहण्यासाठी तळ्याच्या पाण्यात उतरू नये. यापूर्वीही या ठिकाणी काहींना आपला अनमोल जीव गमवावा लागला आहे. आपला जीव महत्त्वाचा आहे. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे याची जाणीव ठेवावी. असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांनी केले आहे.