मद्यपी कारचालकाची दुचाकीला धडक; काही अंतरापर्यंत दोघांना नेले फरफटत, दीड दिवसांनी चालकावर गुन्हा दाखल

By प्रकाश गायकर | Published: August 9, 2024 06:27 PM2024-08-09T18:27:33+5:302024-08-09T18:28:59+5:30

घटनेत एकाला मुक्का मार लागला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे

Drunk driver hits two wheeler After taking the two for some distance a case was registered against the driver after one and a half days in pimple gurav | मद्यपी कारचालकाची दुचाकीला धडक; काही अंतरापर्यंत दोघांना नेले फरफटत, दीड दिवसांनी चालकावर गुन्हा दाखल

मद्यपी कारचालकाची दुचाकीला धडक; काही अंतरापर्यंत दोघांना नेले फरफटत, दीड दिवसांनी चालकावर गुन्हा दाखल

पिंपरी : पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती पुन्हा पिंपळे गुरवमध्ये झाली आहे.  एका चारचाकी वाहनाने डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीला धडक दिली. धडक दिल्यानंतर दुचाकीसह दोघांना काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेत कारचालक मद्यपान करून गाडी चालवत असल्याचे पोलीस तपासत निष्पन्न झाले आहे. दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि. 7) दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास घडला. याप्रकरणी तब्बल दीड दिवसानंतर मद्यपी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

शरद किसन सुरवसे (वय 26, रा. पिंपळे गुरव) आणि मानतेश लिंगाप्पा चीगनुर अशी जखमींची नावे आहेत. शरद सुरवसे यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार (एमएच 14/एलपी 7492) चालक दत्तू रामभाऊ लोखंडे (वय 39, रा. पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी दत्तू लोखंडे याने मद्य प्राशन करून त्याच्या ताब्यातील चारचाकी चालवली. पिंपळे गुरव येथील तुळजाभवानी मंदिराजवळ आल्यानंतर त्याने शरद सुरवसे यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक दिल्यानंतर दुचाकीसह शरद आणि मानतेश यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेले. या अपघातात शरद यांना मुकामार लागला आहे. तर मानतेश हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पिंपळे गुरव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई सुरु 

पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांकडून पोर्शे अपघात प्रकरणानंतर ड्रंक अँड ड्राइव्हच्या कारवाईला जोरदार सुरुवात झाली. पोलिसांनी मध्यंतरीच्या काळात मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांना ताब्यात घेऊन दंड वसूल केला. तसेच त्यांना अटक करून गुन्हाही दाखल केला. पोलिसांकडून कारवाई सुरु असूनही मद्यपान करून गाडी चालवण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून अजूनही ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई खरंच सुरु आहे का? याबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे. 

Web Title: Drunk driver hits two wheeler After taking the two for some distance a case was registered against the driver after one and a half days in pimple gurav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.