निकृष्ट कामामुळे सांडपाणी मैदानात

By Admin | Published: May 11, 2017 04:31 AM2017-05-11T04:31:00+5:302017-05-11T04:31:00+5:30

देहूरोड कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या वतीने चिंचोलीगावात होत असलेली गटारदुरुस्ती व सुधारणा कामे निकृष्ट दर्जाची होत असून, विविध ठिकाणी

Dry waste due to poor work | निकृष्ट कामामुळे सांडपाणी मैदानात

निकृष्ट कामामुळे सांडपाणी मैदानात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या वतीने चिंचोलीगावात होत असलेली गटारदुरुस्ती व सुधारणा कामे निकृष्ट दर्जाची होत असून, विविध ठिकाणी अर्धवट ठेवण्यात आलेल्या कामांमुळे सांडपाणी मोकळ्या मैदानात पसरत आहे.
विविध ठिकाणी चार महिन्यांत चेंबरला झाकणे उपलब्ध झाली नाहीत. परिणामी दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जुन्या उघड्या गटारी सिमेंट पाइप टाकून बंद करताना ठेकेदाराने कामाचा दर्जा राखला नसल्याने गटारीच्या कामाबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या गेल्या महिन्यातील बैठकीत संबंधित ठेकेदाराकडून विविध भागांत गटारींची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याबाबतचा विषय ठेवण्यात आला होता. बोर्डाच्या १७ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार हद्दीतील गटारी दुरुस्ती, सुधारणा करण्याची तीन कोटी रुपयांची प्रस्तावित कामे एस.एस. साठे या ठेकेदार कंपनीस ३४ टक्के अधिक दराची निविदा स्वीकारून दिली आहेत. अधिक दराच्या निविदा स्वीकारल्याने बोर्डाची एक कोटी दोन लाख रक्कम आणखी खर्च होणार आहे. बोर्डाने कामाचे आदेश दिल्यानंतर संबंधित ठेकेदाराने जानेवारी महिन्यात चिंचोली गावातून गटारीच्या कामाला सुरुवात केली. यात प्रामुख्याने जुन्या उघड्या गटारीच्या जागी सिमेंट पाईप टाकून बंद गटारी बांधण्यात येत आहेत. या कामात संबंधित ठेकेदाराने सिमेंट पाइप टाकताना त्याखाली ठरावीक जाडीचा सिमेंट गिलावा व्यवस्थित केलेला नाही. संबंधित कामाचा दर्जा, कुशल मजुरांचा अभाव आदींबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. याबाबत बोर्डाने पत्रव्यवहार केला होता. मात्र ठेकेदाराकडून पूर्तता करण्यात आली नसल्याचे गेल्या महिन्यातील बैठकीत प्रशासनाने स्पष्ट केले होते. चिंचोली, झेंडेमळा, देहूरोड बाजार, थॉमस कॉलनी भागात कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले होते.

Web Title: Dry waste due to poor work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.