नदीपात्रात वाहन धुतल्यास दंड, महापालिका अधिकाऱ्यांना आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:59 AM2018-08-13T01:59:22+5:302018-08-13T01:59:31+5:30
पवना नदीच्या रावेत येथील जाधव घाटावर नदीपात्रात वाहने धुण्याचे प्रकार बिनदिक्कत सुरू होते. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने जाधव घाटावर चर खोदून वाहनांना घाटावर प्रवेशास प्रतिबंध केला आहे.
रावेत : पवना नदीच्या रावेत येथील जाधव घाटावर नदीपात्रात वाहने धुण्याचे प्रकार बिनदिक्कत सुरू होते. परिणामी नदीपात्रात प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे वाहने धुणाºया वाहनचालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. मात्र महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले होते. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने जाधव घाटावर चर खोदून वाहनांना घाटावर प्रवेशास प्रतिबंध केला आहे.
जाधव घाटावर वाहनचालक वाहने धुण्यासाठी गर्दी करत होते. त्यामुळे नदीपात्रातील पाणी प्रदूषित होऊन पाण्यातील जैव साखळीवर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक जलचर प्राण्यांच्या संख्येमध्ये झपाट्याने घट झालेली आहे. वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून पवनेचे नदीपात्र धोकादायक पातळीपर्यंत पोहोचले असताना प्रशासनाने या घाटावर कपडे धुण्यासाठी आणि चारचाकी, दुचाकी आदी वाहनांना प्रवेशास आणि नदीपात्रात वाहने धुण्यास घाटावर चर खोदून निर्बंध घातले आहेत.
नदीपात्राचे झाले होते वॉशिंग सेंटर
वाहनचालकांनी आपली वाहने घाटावर धुण्यास सुरवात केली होती. जलप्रदूषण ही मोठी समस्या बनली आहे. प्रशासकीय यंत्रणे ने आपल्या अधिकाराचा वापर करून या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. घाटावर दररोज वाहने, कपडे, जनावरे धुण्यामुळे पात्र प्रदूषित होत चालले होते. वाहत्या पाण्याबरोबर प्लॅस्टिक, जलपर्णी, कचरा येतो. त्यामुळे नदीपात्राचे प्रदूषण होत असताना वाहने धुण्यामुळे प्रदूषणात वाढ होत होती. सततच्या वाहने धुण्याने नदीपात्राचे वॉशिंग सेंटर झाले होते. प्रशासनाने नदी पात्रांचे सर्वेक्षण करून त्या परिसरामध्ये नागरिकांना वाहने धुण्याकरिता किंवा कपडे धुण्याकरिता कायमस्वरूपी प्रतिबंध करण्यासाठी कडक पावले उचलली आहेत.
दंडात्मक कारवाईचा आदेश
महापालिकेच्या ‘ब’ प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे यांनी याबाबत संबंधित अधिकाºयांना आदेश दिले आहेत. नदीपात्रात वाहने धुणाºया वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. घाटाकडे जाणाºया सर्व मार्गांवर मोठा चर खोदण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्र आणि घाटाकडे वाहनचालकांना वाहने घेऊन जाता येणार नाही.
रसायनांमुळे नदीपात्र प्रदूषित
नदीपात्रामध्ये दिवसेंदिवस इतर कारणांबरोबरच वाहने
धुणाºयांच्या संख्येमध्ये दुपटीने वाढ होत होती. जड वाहनांबरोबरच, दुचाकी, तीनचाकी, बस, ट्रॅक्टर, जीप, ट्रॅव्हलर, एसयुव्ही कार, टेम्पो, हलकी वाहने, घाटावर बिनधास्तपणे धुतली जात होती. कॉस्टिक सोडा, निरमा, साबण, लिक्विड सोप तसेच शाम्पू पुड्यांचा वापर वाहने धुण्यासाठी केला जातो. यात रसायने असतात.
त्यामुळे नदीपात्रातील पाणी प्रदूषित होत होते. त्यामुळे पाणी प्रदूषणामध्ये खूप वाढ झालेली आहे. पवना नदी पात्राच्याअशा प्रदूषित पाण्यामुळे शहरामध्ये साथीच्या रोगांमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.