Pimpri Chinchwad: गांजासह दुडा चुराची ‘झिंग’; उद्योगनगरीला अमली पदार्थाचा विळखा

By नारायण बडगुजर | Published: November 27, 2023 12:12 PM2023-11-27T12:12:39+5:302023-11-27T12:13:59+5:30

तस्करांचे फावले असून, त्यांचे मोठे रॅकेट शहरात सक्रिय आहे....

Duda Chura with Ganja; Drug addiction in Udyog Nagari pune latest news | Pimpri Chinchwad: गांजासह दुडा चुराची ‘झिंग’; उद्योगनगरीला अमली पदार्थाचा विळखा

Pimpri Chinchwad: गांजासह दुडा चुराची ‘झिंग’; उद्योगनगरीला अमली पदार्थाचा विळखा

पिंपरी : गुजरातमार्गे राजस्थानातून अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. यात अफूच्या ‘दुडा चुरा’ या अमली पदार्थाचे प्रमाण सर्वाधिक आहे. गांजापाठोपाठ या दुडा चुराच्या नशेत पिंपरी-चिंचवडमधील अनेक तरुण झिंगत आहेत. या तस्करीकडे अमली पदार्थ विरोधी पथकाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तस्करांचे फावले असून, त्यांचे मोठे रॅकेट शहरात सक्रिय आहे. 

सहज उपलब्ध होत असल्याने तरुणांसह शौकिनांकडून गांजाला पसंती दिली जात आहे. त्यात आता ‘दुडा चुरा’ या अमली पदार्थाची भर पडत आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातून या अमली पदार्थाची तस्करी होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी गांजासह दुडा चुराच्या विळख्यात सापडली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, एमआयडीसीतील कामगार तसेच उच्चभ्रू वर्गातील अनेक जण दुडा चुराच्या आहारी जात आहेत. यात उत्तर भारतातून शहरात दाखल झालेल्यांची संख्या लक्षणीय आहे. 

महामार्गावर मुख्य केंद्र

खासगी ट्रॅव्हल्स बसमधून गुजरातमार्गे मुंबई-पुणे महामार्गावर पोत्यांमधून ‘दुडा चुरा’ आणला जातो. त्यानंतर चारचाकी वाहनांमधून शहरातील दोन ठिकाणी हा अमली पदार्थ पोहचविला जातो. तेथून त्याचे वितरण होते. 

आठवड्यातून दोन दिवस तस्करी

खासगी बसने आठवड्यातील दोन दिवस दुडा चुराची वाहतूक केली जाते. शहरात महामार्गावर सकाळच्या वेळी पोती उतरवली जातात. दिवसाढवळ्या होणाऱ्या तस्करीकडे अमली पदार्थ विरोधी पथकाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.     

आयुर्वेदिक काढा 

खासगी बसमधून आणलेला हा दुडा चुरा म्हणजे आयुर्वेदिक काढा बनिवण्यासाठीची वनस्पती आहे, असे सांगितले जाते. पाण्यात मिसळून त्याचे पेय तयार केले जाते. तसेच दुडा चुरा हा तंबाखू प्रमाणे देखील विक्री केला जातो. 

पाण्यात भिजवून सेवन

दुडा चुरा रात्री पाण्यात भिजवून ठेवला जातो. चुरामधील अर्क पाण्यात उतरतो. ते पाणी सकाळी घेतल्यानंतर दिवसभर अंगमेहनतीचे काम सहज करता येते, असा समज आहे. या दुडा चुरामुळे नशा होऊ शकते. त्यामुळे दुडा चुरा सेवन करणे कायद्याने गुन्हा आहे.  

‘अमली’ विरोधी कारवाई थंडावली

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून तसेच स्थानिक पोलिस ठाण्यांकडून गांजा व अमली पदार्थ विरोधी कारवाया करण्यात येत आहे. त्या तुलनेत पिंपरी-चिंचवड अमली पदार्थ विरोधी पथकाकडून कारवाया होत नसल्याचे दिसून येते. दुडा चुराच्या तस्करीवर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, या पथकाकडून दुर्लक्ष होत आहे.          

काय आहे ‘दुडा चुरा’?

अफूच्या झाडांच्या बोडांना चिरा पाडून त्यातून निघालेला रस वाळून त्याचे ‘अफिम’ होते. त्यानंतर या बोंडांपासून खसखस वेगळे केले जाते. या वाळलेल्या बोंडांना किंवा त्याच्या चुऱ्याला दुडा चुरा असे म्हणतात. या चुऱ्यामध्ये देखील अत्यल्प प्रमाणात ‘माॅर्फिन’ असते. मात्र, त्यामुळे देखील नशा होते.     

गांजाला पर्याय

सहज उपलब्ध होतो म्हणून गांजा सेवन केला जातो. मात्र, त्याला पर्याय म्हणून ‘दुडा चुरा’ला पसंती दिली जात आहे. तसेच पाण्यात भिजवून देखील तो सहज सेवन करता येतो. त्यामुळे अनेक तरुण ‘दुडा चुरा’च्या आहारी जात आहेत.

Web Title: Duda Chura with Ganja; Drug addiction in Udyog Nagari pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.