दस-यानिमित्त आपट्याचे पान म्हणून भलत्याच पानाची होतेय विक्री, आंब्याची डहाळीही झाली महाग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 02:45 PM2017-09-28T14:45:07+5:302017-09-28T14:45:11+5:30
शहरात आंब्याच्या छोट्या डहाळीसाठी दहा रुपये मोजावे लागताहेत. तर आपट्याच्या पानासारखी दिसणारी अन्य वृक्षांची पाने आपट्याची पाने म्हणून गेल्या काही वर्षांपासून सर्रासपणे बाजारपेठेत विक्री होत आहेत.
पिंपरी चिंचवड : सण, उत्सव काळात शहरात मातीपासून वृक्षांच्या पानांचीही विक्री होऊ लागली आहे. ग्रामीण भागात घराला तोरण बांधण्यासाठी आवश्यक असणारी आंब्याच्या वृक्षाची पाने सहज कोठेही उपलब्ध होतात. कोणाच्याही शेताच्या बांधावरील आंब्याच्या वृक्षाची पाने कोणीही घेऊन येते. शहरात मात्र आंब्याच्या छोट्या डहाळीसाठी दहा रुपये मोजावे लागताहेत.
सध्या नवरात्रौत्सवाचा काळ आहे. नवरात्रौत्सवाच्या सुरुवातीस पहिल्याच माळेच्या अगोदर घटस्थापनेसाठी लागणारी माती पिंपरीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होती. छोट्या आकारातील घमेलेभर मातीसाठी २५ रुपये मोजावे लागले. मातीसुद्धा विकत घेण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. घराच्या तोरणासाठी आवश्यक असणारी आंब्यांची पानेसुद्धा पाच ते दहा रुपये देऊन विकत घ्यावी लागताहेत. बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा पूजेचे साहित्य विक्रीस घेऊन बसलेल्यांकडे आंब्याची पाने मिळत आहेत. दस-याच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने सोन्याची लूट अर्थात आपट्याची पाने एकमेकांना देऊन शुभेच्छा देण्याची प्रथा आहे. त्यामुळे आपट्याची पाने मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत विक्रीस आणल्याचे पाहावयास मिळते. आपट्याच्या पानांसाठीही दहा रुपये खर्च करणे भाग पडते.
बनवेगिरी
आपट्याच्या पानासारखी दिसणारी अन्य वृक्षांची पाने आपट्याची पाने म्हणून गेल्या काही वर्षांपासून सर्रासपणे बाजारपेठेत विक्री होत आहेत. पैसे देऊनही आपट्याची पाने मिळत नाहीत. आपट्याची पाने म्हणून दुसरीच पाने दिली जातात. उत्सवातील पारंपरिक प्रथांचे पालन करतानाही बनवेगिरीला सामोरे जावे लागत असल्याची खंत नागरिक व्यक्त करतात.