खुलासा मागविल्याने दणाणले धाबे
By admin | Published: July 3, 2017 03:15 AM2017-07-03T03:15:18+5:302017-07-03T03:15:18+5:30
ठेकेदारांना झालेल्या कामाची बिले काढून देण्यासाठी महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे ३ टक्के रकमेची मागणी करीत आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : ठेकेदारांना झालेल्या कामाची बिले काढून देण्यासाठी महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे ३ टक्के रकमेची मागणी करीत आहेत. मुख्य लेखापालांच्या माध्यमातून ही मागणी केली जात असली तरी त्यामागे भाजपाचे दोन पदाधिकारी आणि स्थायी समितीच्या प्रमुख पदाधिकारी आहेत. अशी तक्रार प्रमोद साठे या कंत्राटदाराने ३ मे २०१७ ला पंतप्रधान कार्यालयाच्या पोर्टलवर नोंदवली. त्याची दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयाने महापालिका आयुक्तांकडे खुलासा मागविला असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
आतापर्यंतची बिले काढून देण्याच्या मोबदल्यात ठेकेदारांकडे ३ टक्के रक्कम मागणाऱ्या मुख्य लेखापाल लांडे यांची तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे दिली असल्याच्या वृत्ताने मागील आठवड्यात खळबळ उडाली. आता त्याची सविस्तर माहिती हाती लागली असून पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या तक्रारीत भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांसह स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांच्या नावाचा उल्लेख असल्याने हे प्रकरण आणखी चर्चेत आले आहे.
२०१६-१७ या वर्षात ठकेदारांनी केलेल्या कामाची बिले अद्याप प्रलंबित आहेत. ३१ मार्च वर्षअखेरची कामे सुरू असल्याने ठेकेदारांची बिले काढण्यास विलंब झाला. अशी सबब पुढे करून बिले रोखण्यात आली होती. मात्र ठेकेदारांनी बिले मिळविण्यासाठी पाठपुरावा केला़ त्या वेळी विशिष्ट रक्कम अदा केल्याशिवाय बिले मिळू शकणार नाहीत, असे मुख्य लेखापाल लांडे यांनी स्पष्ट करताच, ठेकेदार हवालदिल झाले.
३ टक्के रकमेची मागणी केली जात असल्याचा आरोप करीत ठेकेदार साठे यांनी ही तक्रार थेट पंतप्रधानांच्या संकेतस्थळावर नोंदवली आहे. दोषींवर कारवाई करावी, असे साठे यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
बिले मंजूर करण्यासाठी महापालिकेत ठेकेदारांकडून मुख्य लेखापाल तीन टक्के रक्कम मागतात. त्यात स्थायी समिती अध्यक्षा, तसेच भाजपाच्या अन्य दोन पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे, अशा आरोपाची तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे एका ठेकेदाराने केली आहे.
आरोपात काही तथ्य नाही. ठेकेदारांनी बिले वेळेत दिली नाहीत. त्यामुळे त्यांना बिले मिळण्यास विलंब झाला आहे. मुख्य लेखापाल तीन टक्क्यांसाठी अडवणूक करीत असतील, तर तक्रारकर्त्यांनी सबळ पुरावे द्यावेत. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार देऊन अशा लोकांना रंगेहाथ पकडून द्यावे. अशा पद्धतीने थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार नोंदविण्यामागील हेतू बदनामी करण्याचा आहे, हे निदर्शनास येते.
- सीमा सावळे, स्थायी समिती अध्यक्षा