भाजपामध्ये एकमत न झाल्याने विषय समिती सदस्य आणि सभापती पदाची निवड लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 01:28 PM2020-10-07T13:28:12+5:302020-10-07T13:28:45+5:30
पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी भाजपात नावाबाबत एकमत न झाल्याने ही निवड लांबणीवर पडणार..
पिंपरी : मुदत संपल्याने बरखास्त झालेल्या महापालिकेतील विषय समित्यांची निवड केली जाणार आहे. पाच समित्यांमधील सदस्यांची निवड मंगळवारी सर्वसाधारण सभेत होणार होती, मात्र नावाबत भाजपामध्ये एकमत न झाल्याने सदस्य आणि सभापती पदाची निवड लांबणीवर पडली आहे.
कोरोनाकाळात राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विषय समित्यांची निवडणूक घेण्यास मनाई केली होती. महापालिकेतील विषय समित्यांची मुदत १४ जून रोजी संपली. त्यानंतर समित्या बरखास्त झाल्या होत्या. आता व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ऑनलाईन निवडणूक घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे पालिका विषय समित्यांची निर्मिती होणार आहे.
महापालिकेची स्थायी समिती सर्वांत महत्वाची समिती असते. शहरातील विकास कामांबाबतचे सर्व निर्णय ही समिती घेत असते. या समितीचे अध्यक्ष व नवीन सदस्यांची निवड फेब्रुवारी महिन्यात झाली होती. त्यामुळे ती कार्यरत आहे; मात्र विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण, कला-क्रीडा व सांस्कृतिक आणि शिक्षण समित्या बरखास्त झाल्या होत्या. सध्या या समित्यांचे अधिकार सर्वसाधारण सभेकडे आहेत.निवडणूक घेण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे समित्यांची नियुक्ती केली जाणार आहे. ऑक्टोबर महिन्याची सर्वसाधारण सभा आज झाली. या सभेत नवीन सदस्यांची निवड केली जाणार होती. मात्र सत्ताधारी भाजपात नावाबाबत एकमत न झाल्याने ही निवड लांबणीवर पडणार आहे.
............
प्रत्येक विषय समितीवर नऊ सदस्य आहेत. सभागृहातील संख्याबळानुसार नऊ सदस्यांमध्ये भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेचा एक सदस्य असेल. त्या-त्या पक्षाच्या सदस्यांची नावे संबंधित पक्षाचे गटनेते सर्वसाधारण सभेत महापौरांकडे सादर करतात. त्यानंतर सदस्यांच्या नावाची घोषणा केली जाते. यात सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना कोणाला संधी देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.