खंडित वीजपुरवठ्याचा देहूकरांना त्रास कायम
By admin | Published: June 4, 2016 12:14 AM2016-06-04T00:14:34+5:302016-06-04T00:14:34+5:30
राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या देहूगाव व परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यावर कायमचा तोडगा काढावा यासाठी देवी इंद्रायणी येथील स्विचिंग
देहूगाव : राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या देहूगाव व परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यावर कायमचा तोडगा काढावा यासाठी देवी इंद्रायणी येथील स्विचिंग स्टेशन तातडीने सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. १७ मे रोजी आठ दिवसांत हे स्विचिंग स्टेशन सुरू करण्याचे आश्वासन अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश गुजर यांनी दिले होते. मात्र, हे स्टेशन सुरू झालेले नाही.
देहूगाव परिसराला सध्या टेल्को फीडरवरून विद्युतपुरवठा केला जात आहे. पिंपरी-चिंचवड भागात काही कामे सुरू असल्यास या भागातील विद्युतपुरवठा वारंवार खंडित होतो. सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे हैराण ग्रामस्थांनी सरपंच हेमा मोरे, उपसरपंच सचिन साळुंके, ग्रामपंचायत सदस्यांसह महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले होते. या वेळी गुजर यांनी आश्वासन दिले होते.
गुजर म्हणाले, की स्विचिंग सेंटरमधील आर्थिंग कामातील दोष काढला असून, तपासणीही झाली आहे. मात्र, परिसरासाठी लागणारा विद्युतभार उपकेंद्रातून उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठीचा पत्रव्यवहारही केला असून, तीन-चार दिवसांत ही परवानगी आल्यानंतर विद्युतपुरवठा करण्यासाठी टेल्को उपकेंद्रात अंतर्गत बदल करून या फीडरला विद्युत भार घेण्याचे काम बाकी आहे. हे काम झाल्यानंतर देहूला तातडीने विद्युतपुरवठा सुरू करू. (वार्ताहर)