पिंपरीत विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे अधिका-यांना कार्यालयात कोंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 06:26 PM2018-08-03T18:26:57+5:302018-08-03T18:27:58+5:30
पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वच भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना कार्यालयात कोंडले.
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वच भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना कार्यालयात कोंडून बाहेरुन कार्यालयाला टाळे लावले. पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अय्युबखान पठाण, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, विशाल कांबळे यांच्या कार्यालयाला टाळे लावले आहे.
पिंपरी, चिंचवड, तळवडे, रुपीनगर, चिखली, रावेत या परिसरातील पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. धरणात मुबलक पाणी असूनही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. अतिशय कमी दाबाने पाणी पाणीपुरवठा होत आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला आहे. या आंदोलनात विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, अर्पणा डोके, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक जावेद शेख, मोरेश्वर भोंडवे, समीर मासूळकर, प्रवीण भालेकर, पंकज भालेकर, मयुर कलाटे, पोर्णिमा सोनवणे, विनया तापकीर, सुलक्षणा धर, गीता मंचरकर हे सहभागी झाले आहेत.