मावळ तालुक्यात दुष्काळाचे सावट कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 02:31 AM2018-11-01T02:31:03+5:302018-11-01T02:31:25+5:30
परतीच्या पावसाची हुलकावणी; दुष्काळ जाहीर करण्याची नागरिकांची मागणी, उत्पादन घटणार
वडगाव मावळ : मावळ तालुक्याची ओळख असलेल्या आणि आंब्याच्या मोहराप्रमाणे सुगंध असणारे भात हे मुख्य पीक आहे. परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने उत्पादन २५ ते ३० टक्क्यापर्यंत घटले आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी दुष्काळाच्या छायेत सापडला आहे. दुष्काळ जाहीर करावा, यासाठी सर्वच पक्षांनी मागणी केली आहे. मात्र अद्याप दुष्काळ जाहीर झाला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग दुहेरी संकटात सापडला आहे.
भातपिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी मावळ तालुका हा अग्रेसर आहे. सुमारे १२ हजार हेक्टरवर भातपीक लागवडीचे क्षेत्र आहे. त्यामध्ये ७० ते ८० टक्के इंद्रायणी, २० ते २५ टक्के फुले समृद्धी, आंबेमोहरचे प्रमाण खूपच कमी झाले असून, ते एक टक्क्यावर गेले आहे. या वर्षी सुरुवातीला पाऊस चांगला झाला. त्यामुळे भातपीक जोमात येईल, या आशेने शेतकरी आनंदीत होते. परंतु परतीच्या पावसाने धोका दिल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. या वर्षी अधिक पाऊस झाल्याचे शासकीय यंत्रणेकडे नोंद असली तरी भातपिकासाठी जो नंतर पडणारा पाऊस आवश्यक होता. तो न पडल्याने पिकाला मोठा फटका बसला आहे. डोंगर पठारावरील भातपीक सुकून गेले आहे. तर काही भागात खडकाळ शेती आहे. त्या भागातही मोठा फटका बसला आहे. हाताशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अनेक शेतकरी दरवर्षी काहीशा प्रमाणात तांदूळ विकून घरातील वर्षभराचा खर्च भागवतात मात्र यावर्षी भातपिकातच निम्म्याने घट झाल्याने विकले तर घरी खायचे काय आणि नाही विकले तर वर्षाचा खर्च कसा भागवायचा या दुहेरी कात्रीत सापडले आहेत. मावळातील, कुसगाव, पुसाणे, चांदखेड, आढले बुद्रुक, जवण, दिवड, ओव्हाळे, जांभवली, थोराण, मोरमारवाडी, उकसान, पालेनामा, कोंडीवडे, ताजे, सदापूर या शिवाय तिन्ही मावळातील काही गावे दुष्काळसदृश्य स्थितीत आहेत.
तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे म्हणाले, परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने उत्पादनास फटका बसला आहे. मावळ तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या साठी सत्ताधारी भाजपा यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने तहसीलदारांना निवेदन देऊन मागणी केली तर बाळासाहेब नेवाळे यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा काढून मागणी केली.कधी दुष्काळ जाहीर करतंय याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.
भात काढणीला आला वेग
कार्ला : कार्ला परिसरात कार्ला, वेहेरगाव, भाजे, पाटण आदी परिसरात भात काढणीला चांगला वेग आला आहे. भात झोडणीही उरकून घेण्याची मानसिकता अलीकडच्या काळात शेतकºयांची दिसत आहे़ त्यात पावसानेही लवकर ओढ दिली आहे. भात काढून झाले की प्रत्येक शेतकरी शेतात कडधान्ये पेरीत असतो. पण त्याकरिता शेतात काहीशी ओल असण्याची आवश्यकता आहे. पावसाने लवकर ओढ दिल्याने शेतीची ओल वाढण्याची शक्यता कमी आहे़ लवकर भातकाढणी करून शेत लवकर पेरण्यासाठी शेतकºयांची धावपळ चालू आहे. पण यावर्षी पावसाने ओढ दिल्याने कडधान्ये पेरायला शेतात ओल येते की नाही, याबद्दल शेतकºयांच्या मनात संभ्रम आहे आणि म्हणून लवकर भात काढणी करून जमले तर भातझोडणी करून शेत मोकळे करून पेरणी करण्यासाठी मोठी लगबग चालू आहे.