दुष्काळग्रस्तांची पाऊले शहरांतील मजूर अड्ड्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 01:41 AM2018-11-30T01:41:09+5:302018-11-30T01:41:26+5:30

स्मार्ट सिटीत कामासाठी वणवण : बेरोजगारांचा शहराकडे लोंढा; पडेल ते काम करण्याची आली वेळ

Due to the drought PEOPLE GOING FOR LABOUR IN CITY | दुष्काळग्रस्तांची पाऊले शहरांतील मजूर अड्ड्यांकडे

दुष्काळग्रस्तांची पाऊले शहरांतील मजूर अड्ड्यांकडे

Next

रावेत : दोन वेळ पोटाला अन्न मिळेना... लेकरं-बाळं उपाशी राहायची वेळ आली... त्यात कामधंदा रोज मिळेना... काम मिळालं, तर कुठंबी जावं लागतंय... डोक्यावर घमेले, एका हातात फावडे आणि दुसऱ्या हातात दोन वेळचा जेवणाचा डबा. ज्या दिशेने कामासाठी ठेकेदार नेण्यासाठी येतील, त्या दिशेने पळत सुटणे आणि गाडीवर बसून कामाला जाणे. ज्याला काम नाही मिळत, तो घुटमळत तिथेच उभा राहतो, असे दृश्य बिजलीनगर येथील मजूर अड्ड्यावर पाहायला मिळत आहे. राज्यात दुष्काळ आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त कामाच्या शोधात स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल होत आहेत. असा बेरोजगारांचा लोंढा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे शहरातील मजूर अड्ड्यांवर दररोज मजुरांची गर्दी वाढतच आहे.


शहरातील मजूर अड्ड्यांवर इमारतींचे बांधकाम करण्यासाठी अथवा बांधकाम साहित्याचे ने-आण करण्यासाठी, सोसायटीची व घरांची विविध प्रकारची अवजड कामे, प्लम्बिंगची कामे, मालाची ने-आण करणे, बगीच्यामध्ये माळी काम, पायाभूत सुविधांची कामे, दुकान किंवा हॉटेलमध्ये काम करण्यासाठी सहजपणे मजूर अथवा कामगार मिळतात. त्यामुळे नागरिकांना विविध प्रकारची कामे करण्यासाठी या मजूर अड्ड्यांचा फायदा होत आहे. या मजूर अड्ड्यांवर मजुरांना कामानुसार पैसे मिळतात. साधारण पाचशे रुपये दिवसभरातील कामाची रोजंदारी मिळते. बांधकाम करणाºया गवंड्याला आठशे रुपये रोजंदारी मिळते. या सर्व अड्ड्यांवर मराठवाडा आणि विदर्भातून आलेल्या मजुरांची संख्या अधिक आहे. तसेच, गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे येणाºया मजुरांची संख्या कमालीची वाढली आहे. हे मजूर कमी पैशांतही काम करण्यास तयार असल्याने इतर मजुरांवर उपासमारीची वेळ येत आहे. रोज कामासाठी मजुरांना सात वाजताच घर सोडावे लागते. लवकर अड्ड्यावर आले तर काम लवकर मिळते. कामासाठी आल्यानंतर हाताला काम मिळेल की नाही याची शाश्वती नाही. तरीही कशाची तमा न बाळगता मुला-बाळांना घरी सोडून हे मजूर कामाच्या शोधत येतात. कित्येक वेळा काम मिळाले नाही, तर रिकाम्या हाताने परतावे ही लागते. मिळेल ते काम करावे लागते.


सकाळीच सात-आठ वाजेपासूनच या मजूर अड्ड्यांवर महिला व पुरुष जमतात. १७-१८ वयाची मुले दिसतात. काहींची शिक्षण जेमतेम तर काही पदवीधरसुद्धा आहेत. जेवढ्या लवकर येणार त्यावर दिवसाची रोजनदारी मिळणार म्हणून अड्ड्यांवर येण्याची घाई या मजुरांना असते. दिवसाचे ४०० ते ५०० रुपये रोज मिळतो. त्यात रोजच काम मिळेल याची काही शाश्वती नाही. त्यामुळे पडेल ते काम करण्याची तयारी असते. सेंट्रिंग काम, घरगुती काम, खड्डे खोदायचेत, पाणी भरायचंय, जागा सफाई, गवत कापणी यांसारख्या कोणत्याही कामासाठी ही माणसं तयार आहेत. गावात नाही तर शहरात तरी काम मिळेल या आशेने शहरात गावांकडून नागरिक कामाच्या शोधात येत आहेत.
मजूर अड्ड्यांवर दुचाकीवर एक व्यक्ती आली की कामासंदर्भात त्या व्यक्तीच्या आजूबाजूला अनेक मजूर काम मिळण्यासाठी गर्दी करतात. मात्र त्या व्यक्तीने त्या गर्दीमधील शरीराने तंदुरुस्त असलेल्या तरुणांना सोबत घेतो व इतरांना दुसºया व्यक्तीची वाट पाहावी लागते.

मजूर अड्ड्यांवर पुरुषांप्रमाणेच महिलावर्गाचीही गर्दी होते. अंदाजे २५ ते ३० महिला हातात डबे घेऊन कामाच्या शोधात उभ्या असतात. मात्र ठेकेदार मंडळी कामाच्या ठिकाणी पुरुषांनाच जास्त प्राधान्य देत असल्यामुळे महिलांना कमी प्रमाणात काम मिळते. काही महिलांना काम मिळते तर काही महिलांना परत घरी जावे लागते आणि काम मिळालेच तर आठवड्यातून दोन-तीन दिवसच मिळत असल्याचे काही महिलांनी सांगितले.

मराठवाडा, विदर्भातील मजूर जास्त
बांधकामावर विटा, वाळू, सिमेंट वाहण्याचे काम मिळते. कधी घरातील साफसफाई, तर कधी चेंबर साफ करण्याचेदेखील काम मिळते. कधी कधी सोसायटीमधील साफसफाईची कामे मिळतात, असे मजुरांनी सांगितले. अनेकांचे उंबरे झिजवून झाले मात्र काम काही मिळेना अशी व्यथा महाराष्ट्रातील विविध भागांतून येथे कामाला आलेल्या मजुरांची मांडली आहे. मराठवाडा, विदर्भ आदी भागांतील नागरिकांना गावाकडे काम नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी लोंढे शहरात येत आहेत. शेती, बांधकामे, कारखाने कोणत्याही ठिकाणी काम करण्याची त्यांची तयारी आहे. या मजुरीत अनेक अल्पवयीन मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण यांचा समावेश आहे. काही ज्येष्ठ नागरिक व महिलांना काम होत नसतानाही पोटासाठी उतारवयात काम करण्याची वेळ आली आहे. मजूर अड्ड्यावर बाया-माणसांचा घोळका जमला की काय काम आहे, रोज काय मिळेल, यासाठी एकच गलका उडतो.

Web Title: Due to the drought PEOPLE GOING FOR LABOUR IN CITY

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.