देवघर येथे खाणीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
By admin | Published: March 15, 2016 03:51 AM2016-03-15T03:51:50+5:302016-03-15T03:51:50+5:30
देवघर (ता. मावळ) येथे एका विद्यार्थ्याचा खाणीत बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी एकच्या दरम्यान घडली.
लोणावळा : देवघर (ता. मावळ) येथे एका विद्यार्थ्याचा खाणीत बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी एकच्या दरम्यान घडली.
प्रशांत संतोष यादव (वय १७, रा. देवघर) असे खाणीत बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो लोणावळ्यातील डॉ. बी. एन. पुरंदरे कला आणि वाणिज्य महाविद्यालय वलवण येथे ११वीत कला शाखेत शिकत होता. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत हा दुपारी त्याच्या मित्रांसमवेत देवघर येथील दगडाच्या खाणीत पोहायला गेला होता. पोहताना त्याची दमछाक झाल्याने तो खाणीच्या खोल पाण्यात पडून बुडाला.
सायंकाळी साडेसहा वाजता पोलिसांनी लोणावळ्यातील शिवदुर्ग ट्रेकिंग अॅडव्हेंचर क्लबच्या सदस्यांच्या मदतीने प्रशांतचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप येडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एम. एम. जनकर करीत आहेत. पोहता येत नसेल तर पाण्यात उतरु नये, खोल पाण्यात जाताना योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (वार्ताहर)