पिंपरीत आवक घटल्याने फळभाज्या महाग
By Admin | Published: July 4, 2017 03:49 AM2017-07-04T03:49:49+5:302017-07-04T03:49:49+5:30
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून उपवासाच्या पदार्थाला मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पिंपरी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून उपवासाच्या पदार्थाला मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पिंपरी बाजारात फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भेंडी, भुईमुगाच्या शेंगा, बटाटे आणि रताळे यांच्या भावात वाढ झाली आहे.
मान्सूनचे वेळेवर आगमन झाले. मात्र, जुलै सुरू झाल्यानंतरही पावसाने ओढ दिली आहे. यामुळे उत्पादन कमी झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. उत्पादन कमी असल्याने फळभाज्यांची आवकेत घट झाल्याचे विक्रते व व्यापा-यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गावरान रताळी चवीला गोड आणि पौष्टिक असल्याने ग्राहकांची पसंती गावरान रताळ्यास जास्त आहे. गावरान रताळे ३५ ते ४० रुपये प्रति किलो, तर सटाणा रताळे ३० रुपये प्रति किलो दराने मिळत आहे. भुईमुगाच्या शेंगांची ४० ते ५० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. पिंपरी मंडईत फळांची आवाक चांगली आहे. त्यामुळे केळी, सरफरचंद, सीताफळ, मोसंबी, संत्री, पेरू व डाळिंबाची आवक पुरेशी आहे. त्यामुळे राज्यातील व परराज्यातून येणा-या फळांचे भाव स्थीर आहेत, असे व्यापा-यांनी सांगितले.
हिरवी मिरची तेजीत
पिंपरीतील मुख्य भाजी मंडईत काल मिरचीचे भावही तेजीत होते. आवक कमी झाल्याने मिरची प्रतिकिलो ८० रुपये होती. फळभाज्यांमध्ये भेंडी ४० रुपये, गवार ४० रुपये, टोमॅटो २० रुपये, तर बटाटा १० रुपये किलो दराने होता. फळामध्ये केळी ४० रुपये डझन, तर पपई ३० रुपये किलोने विक्री केली जात होती.
मागील वर्षी एकादशीच्या काळात रताळ्याची आवक जास्त होती. त्यामुळे २० ते २५ रुपये किलोने विक्री केली जात होती. मात्र, यंदा उत्पादनच कमी झाल्याने मार्केटला मालच नाही. त्यामुळे आपोआप रताळ्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे.
- शांताबाई चव्हाण, भाजी विक्रेत्या