वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे वाकड भूमकर चौक दोन तास जाम
By Admin | Published: October 22, 2016 12:01 AM2016-10-22T00:01:45+5:302016-10-22T00:04:22+5:30
रात्री नऊ नंतर बेशिस्त वाहनचालक लेन कटिंग करून आडवी-तीडवी वाहने अचानक सामोरा-समोर आल्याने वाकड भूमकर चौक रात्री सुमारे दोन तास जाम झाल्याने
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 21 - रात्री नऊ नंतर बेशिस्त वाहनचालक लेन कटिंग करून आडवी-तीडवी वाहने अचानक सामोरा-समोर आल्याने वाकड भूमकर चौक रात्री सुमारे दोन तास जाम झाल्याने दमून भागून घराकडे जाणाऱ्या आयटी अभियंत्यांसह कामगार वर्गाची व स्थानिकांची मोठी अबदा झाली. वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली.
येथील भूमकर चौकातील भुयारी मार्गावरून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे तर खालून विविध मार्ग गेले आहेत त्यामुळे हा चौक एरवी वर्दळीने भरलेला असतो रात्री साडे आठ पर्यंत येथे वाहतूक पोलीस कार्यरत असतात मात्र शुक्रवारी रात्री नऊ नंतर एकाच वेळी आलेल्या अनेक वाहनचालकांनी चौकात कोणीच नसल्याचा फायदा घेत वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहने आडवी तीडवी घातली त्यामुळे अनेक वाहने एकाच वेळी समोरासमोर अडकल्याने वाहतुकीचा खेळ खंडोबा झाला डांगे चौक हिंजवडी रस्त्यावर भूमकर वस्ती ते काळाखडक जाधव कॉर्नर पर्यंत तर इकडे माय कार शोरूम पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
अचानक झालेल्या या वाहतूक कोंडीत सर्वचजण अडकून पडले मात्र वाहतूक कोंडी कशामुळे झाली आहे कोणाला समजेना जिकडे-तिकडे गोंधळ सुरु झाला त्यात काही मिनिटांपूर्वी वाहतूक पोलीस घरी गेल्याने वाहतुकीचे नियमन करायला कोणीच नसल्याने आणखी बट्ट्याबोळ झाला अखेर वैतागलेल्या काहींनी याबाबत नियंत्रण कक्षाला माहिती देताच वाहतूक अधिकाऱ्यांनी घरी केलेल्या चार ते पाच वाहतूक कर्मचाऱ्यांना माघारी बोलावीत त्यांची मदत घेतली अन पावणे अकरा वाजता वाहतूक पूर्ववत झाली. याबाबत वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक म्हणाले शिवाजी चौक आणि भूमकर चौक येथे उद्यापासून एक कर्मचारी आणि वार्डनची रात्री उशिरा पर्यंत नेमणूक करण्यात येईल.