रहिवाशांना हाताळता येत नसल्याने इमारतीतील यंत्रणा कुचकामी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 01:56 PM2019-06-19T13:56:13+5:302019-06-19T13:59:53+5:30
यंत्रणा असूनही अग्निशामक दलाच्या जवानांची यंत्रणा उपलब्ध होण्याची प्रतीक्षा करण्याची वेळ रहिवाशांवर येऊ लागली आहे.
पिंपरी : बांधकाम नियमावलीत आमूलाग्र बदल झाले आहेत. २३ मीटरपर्यंत उंचीच्या इमारतींना परवानगी मिळू लागल्याने उंचच उंच मजले ठिकठिकाणी साकारले आहेत. आगीची घटना अथवा अन्य दुर्घटना घडल्यास आपत्कालीन व्यवस्थापनाच्या उद्देशाने ही सुविधा दिली जाते. तसेच अग्निशामक यंत्रणाही सज्ज असते. अग्निशामक यंत्रणा हाताळण्याचे प्रशिक्षण नसल्याने ही यंत्रणा वापरता येत नाही, आग लागल्यानंतर उपलब्ध यंत्रणा असूनही अग्निशामक दलाच्या जवानांची यंत्रणा उपलब्ध होण्याची प्रतीक्षा करण्याची वेळ रहिवाशांवर येऊ लागली आहे.
अग्निशामक यंत्रणा इमारतीत उपलब्ध करून देणे बांधकाम व्यावसायिकास कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. अग्निशामक यंत्रणा उपलब्ध करून दिली जात नाही. तोपर्यंत महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी आवश्यक असणारे ना हरकत प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे मोठ्या गृहप्रकल्पांमध्ये हमखास अग्निशामक यंत्रणा असते. ही यंत्रणा जरी सज्ज असली तरी सोसायटीतील रहिवाशांना ही यंत्रणा हताळण्याचे तसेच वापराचे पुरेसे ज्ञान नसते. त्यांच्याकडे नेमलेल्या सुरक्षारक्षकांनाही अशी अत्याधुनिक यंत्रणा वापरात आणण्यासंबंधीचे प्रशिक्षण नसते. त्यामुळे यंत्रणा उपलब्ध असूनही अग्निशामक दलाच्या जवानांनाच बोलावले जाते. उपलब्ध असलेली यंत्रणा तातडीने वापरणे शक्य होत नाही. हा प्रकार शहरात नुकत्याच घडलेल्या आगीच्या घटनांमुळे ऐरणीवर आला आहे. इमारतीतील अग्निशामक यंत्रणा सुस्थितीत आहे, की नाही याचीही तपासणी होत नाही.
............
आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेची होत नाही वेळीच तपासणी
उंच इमारतींना दर १२ मीटर उंचीवर रिफ्यूजी एरिया म्हणून मोकळी जागा उपलब्ध करून दिली जाते. आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने अलीकडच्या काळात सर्वच बांधकाम व्यावसायिक गृहप्रकल्पांमध्ये असा रिफ्यूजी एरिया उपलब्ध करून देतात. आगीची घटना घडताच त्या मजल्यांवर राहणारे रहिवासी एका ठिकाणी जमू शकतात. त्यांच्या मदतीसाठी बाहेरून आणलेली यंत्रणा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते.
..........
मोठी शिडी, अथवा क्रेन रिफ्युजी एरियाजवळ नेले जाते. मदतकार्य मोहीम राबविणे शक्य असते. परंतु सर्व काही उपलब्ध असूनही वेळेत त्यांचा वापर होत नसल्याने आगीच्या घटनांमध्ये होणारे नुकसान टाळणे अद्याप शक्य झालेले नाही.
.............