नैसर्गिक स्त्रोताच्या नष्टतेमुळे पाण्याचा वारसा संपतोय : शशांक देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 02:34 PM2018-05-28T14:34:19+5:302018-05-28T14:34:19+5:30
भूजलाचा उपयोग, भूजल वापराबाबतची अनभिज्ञता यावर भाष्य करताना शहरी भागातील लोकांनी एकत्र येऊन भूजल साठवणुकीचे प्रकल्प संयुक्तरित्या राबविण्यावर भर दिला पाहिजे
पिंपरी-चिंचवड : शहरातील भूजलाचे पूर्ण शोषण झाले असून त्याचे अधिक शोषण करण्यास आता वाव नाही. जमिनीपासून कमी स्तरावर पाण्याचा जरी उपसा झाला तरी त्याचे दरवर्षी पुनर्भरण होऊन तो स्तर कायम राहतो. मात्र इंधन विहिरीतील (बोअरवेल) पाणी मात्र शेकडो वर्षांचे जुने असते तर अधिकाधिक खोल विहिरीतील पाणी हजारो वर्षांपूर्वीचे जुने असते. असा हा नैसर्गिक स्त्रोत आपण अत्यंत निष्काळजीपणे नष्ट करत असल्याने पुढील पिढीसाठी आपण कोणताही वारसा संपवतोय, ही खेदजनक बाब ज्येष्ठ भू-वैज्ञानिक शशांक देशपांडे यांनी वाकड येथे व्यक्त केली.
पिंपरी-चिंचवड को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीज फेडरेशन आणि पिंपरी चिंचवड सिटिझन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २७) भूजलाचे सामुहिक पुनर्भरण आणि पर्जन्य जलसंचयन या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी देशपांडे बोलत होते. परिसंवादाद्वारे ज्येष्ठ भूजल संशोधक डॉ हिमांशू कुलकर्णी आणि वरिष्ठ भू-वैज्ञानिक शशांक देशपांडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत या विषयावरील विविध पैलूंचे विवेचन केले. यावेळी शिवसेना गटनेते नगरसेवक राहुल कलाटे, तुषार कामठे तसेच वाकड आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शंभरहून अधिक सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड सिटीझन फोरमचे निमंत्रक तुषार शिंदे यांनी पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश,पवना नदी शुद्धीकरण, मेट्रो प्रकल्प राबविण्यातील सकारात्मक भूमिका यांसारख्या प्रकल्पातील फोरमच्या योगदानाविषयी माहिती दिली.
कुलकर्णी म्हणाले, भूजलाचा उपयोग, भूजल वापराबाबतची अनभिज्ञता यावर भाष्य करताना शहरी भागातील लोकांनी एकत्र येऊन भूजल साठवणुकीचे प्रकल्प संयुक्तरित्या राबविण्यावर भर दिला पाहिजे. तसेच बदलते पर्जन्यमान आणि त्याचा भूजल साठवणुकीवर होणारा परिणाम यावर त्यांनी आपले मत मांडले. पूर्वी पावसाळ्याचे चार महिन्यातच नियमित वृष्टी होत असत पण दिवसेंदिवस निसर्ग आपले रूप पालटतो आहे. ते अत्यंत धोकादायक आहे.
सूत्रसंचालन सुधीर देशमुख यांनी केले तर आभार अरुण देशमुख यांनी मानले.