मॉलमुळे सत्ताधाऱ्यांचे ‘अस्तित्व’ धोक्यात
By admin | Published: June 14, 2016 04:44 AM2016-06-14T04:44:48+5:302016-06-14T04:44:48+5:30
येथील संत तुकाराममहाराज व्यापारी संकुलाजवळील कला दालनात अस्तित्व मॉल सुरू केला होता. बचत गटांच्या नावाखाली सुरू असलेल्या मॉलच्या माध्यमातून व्यावसायिक वापर होत असल्याचे
निगडी : येथील संत तुकाराममहाराज व्यापारी संकुलाजवळील कला दालनात अस्तित्व मॉल सुरू केला होता. बचत गटांच्या नावाखाली सुरू असलेल्या मॉलच्या माध्यमातून व्यावसायिक वापर होत असल्याचे भाजपाने उघडकीस आणले होते. या मॉलची चौकशी सुरू केल्यानंतर संबंधित संस्थेला महापालिकेने नोटीस बजावली आहे. मात्र, कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. हा मॉल चालविणारी संस्था सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उच्चपदस्थ पदाधिकाऱ्याशी संबंधित असल्याने नोटीस हा केवळ फार्स असल्याची टीका भाजपाने केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने अस्तित्व मॉल सुरू केला होता. तिथे पूर्णत: व्यावसायिक कंपन्यांच्या ब्रँडेड वस्तूंची विक्री होत असून, येथील व्यावसायिक आणि विक्रेत्यांकडून दरमहा भाड्यापोटी लाखो रुपये उकळले जात आहेत. याबाबत येथील समन्वय संस्था आणि संबंधितांची चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली होती. त्यानुसार आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष घातले असून, संबंधित समन्वय समितीला नोटीस बजावली. तसेच समन्वय संस्था म्हणून येथील बचत गटांचे कामकाज, हिशेब, त्रैमासिक लेखापरीक्षण, त्याची तपासणी मान्यताप्राप्त लेखापरीक्षकाकडून करून घेणे बंधनकारक असतानाही संबंधित संस्थेने हा अहवाल सादर न केल्याचा आक्षेप घेतला होता.(वार्ताहर)
कारवाईची मागणी
कागदपत्रांची पूर्तता नसताना आणि करार वेळेवर न केल्याने महापालिकेच्या लाखो रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाले आहे. दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आक्षेपही घेण्यात आला होता.
बचत गटांचे आयुक्तांना निवेदन
दरम्यान, बचत गटांच्या प्रतिनिधींनी या संदर्भात बाजू मांडण्यासाठी आयुक्तांची भेट घेतली होती. निवेदन दिले होते. तसेच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना भेटूनही बचत गटांनी भूमिका मांडली होती. त्यामुळे आयुक्तांवर राजकीय दबाव येऊ शकतो. तसेच संबंधित संस्था ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तारूढ नेत्यांशी संबंधित आहे. त्यामुळे कारवाई होणार का, असा प्रश्न भाजपाने उपस्थित केला आहे.