ध्येयवेड्या व्यक्तींमुळे उद्योगनगरीला ओळख
By admin | Published: December 7, 2015 12:01 AM2015-12-07T00:01:49+5:302015-12-07T00:01:49+5:30
‘मिनी भारत’ म्हणून ओळख निर्माण झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरात राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेले लोक गुण्यागोविंदाने राहतात
पिंपरी : ‘मिनी भारत’ म्हणून ओळख निर्माण झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरात राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेले लोक गुण्यागोविंदाने राहतात. सामाजिक बांधिलकीची भावना ते जोपासतात. ध्येयवेड्या व्यक्तींमुळे या शहराला स्वतंत्र ओळख मिळाली आहे. अशी ध्येयवेडी माणसे असल्याने कामे करण्यात अडचणी येत नाहीत. विविध क्षेत्रांत लीलया संचार करणाऱ्या व्यक्तींचा हा गौरव आहे, असे गौरवोद्गार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
पिंपरी-चिंचवड सार्वजनिक विश्वस्त प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कॉसमॉस बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांना पुणे जिल्हा सहकार भूषण, प्रसिद्ध उद्योजक राजेशकुमार साकला यांना पिंपरी-चिंचवड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात शनिवारी हा गौरवसोहळा झाला. या कार्यक्रमास महापौर शकुंतला धराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष पाटील, मुख्य सल्लागार भाऊसाहेब भोईर, स्थायी समिती सभापती अतूल शितोळे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, श्रीमंत दगडुशेट हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे आदी उपस्थित होते.
पुरस्कार वितरण समारंभावेळी पवार म्हणाले, ‘‘समाजामध्ये चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक केले, तर त्यांना समाधान मिळते. या शहराने नेहमीच सर्वांचे आदरातिथ्य केले आहे. शहराला सांस्कृतिक दर्जा मिळावा, साहित्य व कला क्षेत्रात स्थानिकांना वाव मिळावा, यासाठी ते नेहमी प्रयत्न करीत आहेत.’’
पुरस्काराला उत्तर देताना गोयल म्हणाले, ‘‘कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या व्यक्तीच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना अभिमान वाटतो. पुरस्कार मिळावा म्हणून कधीच काम केले नाही. जे काम केले, ते मनापासून केले. सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, शैक्षणिक या क्षेत्रांत कारकीर्द घडवत राहिलो. व्यवसायात मिळविलेल्या पैशांतून समाजासाठी काही तरी करायचे, हे माझे ध्येय होते. त्याची दखल घेतली गेली. पुरस्काररूपाने त्याची पावती मिळाली आहे.’’
‘पिंपरी-चिंचवड ही माझी कार्यभूमी आहे. या शहराने मला सर्व काही भरभरून दिले आहे. या शहराच्या विकासात आपले योगदान राहावे, या उद्देशाने यापुढेही काम करत राहीन,’ अशा भावना साकला यांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रल्हाद कोकरे (प्रशासकीय), ज्ञानेश्वर मुरकुटे (धार्मिक), राहुल भोईर (सामाजिक), रवी महाजन (कामगार संघटन), सुभाष मालुसरे (सामाजिक), अविनाश कदम (क्रीडा) यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या गीतांच्या कार्यक्रमाने समारोप झाला. (प्रतिनिधी)