वाहनतळ नसल्याने रस्त्यावरच वाहने
By admin | Published: December 8, 2015 12:03 AM2015-12-08T00:03:42+5:302015-12-08T00:03:42+5:30
स्वर्गीय राजीव गांधी माहिती-तंत्रज्ञाननगरी हिंजवडी येथे वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्याने चालकांना वाहने रस्त्यावरच उभी करावी लागत आहेत.
पिंपरी : स्वर्गीय राजीव गांधी माहिती-तंत्रज्ञाननगरी हिंजवडी येथे वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्याने चालकांना वाहने रस्त्यावरच उभी करावी लागत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. शिवाजी चौक हिंजवडी ते मारुंजी, शिवाजी चौक ते संत तुकाराम गार्डन, शिवाजी चौक ते फेज एक या रस्त्यावर दुतर्फा वाहने व प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाही उभ्या असल्याने येथील कोंडी फुटणार कधी?
हिंजवडीतील कोंडीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. माहिती-तंत्रज्ञाननगरीची उभारणी करताना, भविष्याचा वेध घेऊन पायाभूत सुविधा सक्षम करण्याकडे महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ अर्थात एमआयडीसीने लक्ष न दिल्याने त्याचे परिणाम आज उद्योजक, कामगार आणि या परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर होत आहे. वेळ आणि पैसा या दोन्हींचा अपव्यय होत आहे. याकडे येथील सत्ताधारी, राजकारणी गांभीर्याने लक्ष देत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे.
वाहतूक पोलिसांची कारवाईच नाही
केवळ मुख्य चौकातील वाहतूक नियंत्रण करण्याशिवाय ठोस उपाययोजना वाहतूक पोलिसांनी केलेल्या नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूककोंडीत भरच पडत आहे. शिवाजी चौकात वाकडकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक दुकानदारांनी पदपथावरच दुकाने थाटली आहेत, तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा रस्त्यावरच उभ्या केल्या जात असल्याने सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा आणि सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ या वेळेत रिक्षांमुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. अशीच अवस्था शिवाजी चौक ते फेज एक या रस्त्यावर आहे. चौकापासून सुमारे तीनशे मीटरपर्यंत आणि याच चौकातून मारुंजी रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर वाहने रस्त्यावरच उभी असतात. फळवाले, हातगाडीवाले उभे राहत असल्याने पादचाऱ्यांना चालणेही कठीण होते.
वाहनतळाचे नियोजन नाहीच
माहिती-तंत्रज्ञाननगरीत प्रवेश केल्यानंतर फेज एक रस्ता, फेज दोन रस्ता आणि फेज तीन रस्ता या तिन्ही रस्त्यांवर, तसेच अंतर्गत रस्त्यांवर वाहनतळाची सोय नसल्याने रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. कंपन्यांच्या आवारात वाहनांसाठी सोय केलेली आहे. मात्र, वाहनांच्या संख्येच्या तुलनेत ही सोय पुरेशी नाही. कामगारांव्यतिरिक्त येणाऱ्या वाहनांनाही रस्त्यावर वाहने उभी राहण्यासाठी सोय केलेली नाही. शिवाजी चौकापासून इन्फोसिस चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहने दिसून आली. (प्रतिनिधी)