प्रलंबित कामांमुळे पालखी मार्ग बिकट, वारकऱ्यांची होणार गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 03:18 AM2018-06-15T03:18:16+5:302018-06-15T03:18:16+5:30
महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून वारीत सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल होतात. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा वीस दिवसांवर येऊन ठेपल्याने सोहळ्याची लगबग सुरू झाली आहे. असे असले, तरी पालखी मार्गाची कामे अद्यापही प्रलंबित आहेत.
दिघी : महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून वारीत सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल होतात. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा वीस दिवसांवर येऊन ठेपल्याने सोहळ्याची लगबग सुरू झाली आहे. असे असले, तरी पालखी मार्गाची कामे अद्यापही प्रलंबित आहेत. संथगतीने होणाºया कामांमुळे वारकºयांसाठी पालखी मार्ग सुकर होईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पालखी मार्गाच्या रुंदीकरणात प्रलंबित कामांची यादी मोठी आहे. पालखी सोहळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यात येतील, असा दावा महापालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
पालखी मार्गावरील अडथळे दूर करण्याची मागणी वाहनचालक आणि वारकºयांकडून करण्यात येत आहे. पालखी मार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. यातील बहुतांश काम मार्गी लागले आहे. असे असले, तरी उर्वरित काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न वाहनचालक आणि वारकºयांकडून उपस्थित करण्यात येत आहे. ठिकठिकाणी या मार्गाचे काम रखडले आहे. काही ठिकाणी दुभाजकांचे काम प्रलंबित आहे. दुभाजकांमध्ये मातीचा भराव टाकून त्याचे सुशोभीकरण होणे आवश्यक आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पदपथांचीही अशीच अवस्था आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यादरम्यान वारकºयांची कुचंबणा होण्याची दाट शक्यता आहे. कामे प्रलंबित असल्याने वारकºयांची वाट बिकटच राहणार की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
दत्तनगर ते हिंदू स्मशानभूमीपर्यंत झालेल्या पालखीमार्गावरील दुभाजक रंगरंगोटी न केल्याने ओसाड आहेत. दुभाजकात मातीचा भराव, वृक्षारोपण, सुशोभीकरण अशी सर्व कामे प्रलंबित आहेत. पालखी मार्गावरील साई मंदिराजवळील दुभाजकाची कामे संपली असली, तरी येथील कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या दुभाजकांमध्ये मातीचा भराव न टाकता वृक्षारोपण करण्यात आले आहे. दुभाजकात डांबरमिश्रित खडी, वाळू, दगडांचा भराव टाकण्यात आला आहे. यावर मातीचा भराव टाकून झाडे लावल्यास किती दिवस जगणार याची साशंकता निर्माण होते. या दुभाजकांमध्ये लावण्यात आलेली दहा-बारा फूट उंचीची झाडे वाºयाने रस्त्यावर वाकली आहेत. या झाडांना कुठलाही आधार, संरक्षक जाळी नसल्याने ऐन पावसाळ्यात झाडे मोडून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रुंदीकरणाचे चार टप्प्यांत काम
आळंदी ते दिघी दरम्यान पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम चार टप्प्यांत करण्यात येत आहे. यात वडमुखवाडी येथील पादुका मंदिर ते दिघी दरम्यानच्या पालखी मार्गाचे काम अपूर्णावस्थेत आहे. उर्वरित मार्गाचेही काम अपूर्ण आहे. पालखी सोहळ्यापूर्वी या मार्गाचे काम पूर्ण करण्यात येईल, असा दावा महापालिका अधिकाºयांकडून करण्यात येत आहे.
पदपथावर राडारोडा, अतिक्रमण
पालखी मार्गावरील पदपथावर अनेक ठिकाणी राडारोडा पडून आहे. काही ठिकाणी झाडांच्या तुटलेल्या फांद्या टाकल्याने अडथळा निर्माण झाला आहे. पालखी मार्गावरील मॅगझिन चौकातील रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्यात येत असल्याने परिसर विद्रूप होत आहे. शिवाय या मोकळ्या दुभाजकांमध्ये काही विक्रेते ठाण मांडून बसले आहेत. मॅगझिन चौकातील सेवा रस्ता टपरीधारकांनी गिळंकृत केला आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व्यावसायिकांची मुजोरी वाढत असून, दुभाजकांत दुकानाच्या नावाच्या पाट्या, रस्त्यावर वाहनांच्या रांगा सर्रास लागतात.
धोकादायक गतिरोधक
४पालखी मार्गावर वाहनांच्या वेगाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि सुरक्षेच्या कारणास्तव ठिकठिकाणी गतिरोधक उभारण्यात आले आहेत. मात्र ते शास्त्रोक्त पद्धतीचे नसल्याचे दिसून येते. त्यामुळे वाहनचालकांना येथे कसरत करावी लागते. वाहन आदळण्याचे प्रकार या गतिरोधकांमुळे होतात. या गतिरोधकांची त्वरित दुरुस्ती करून शास्त्रीय पद्धतीने त्यांची उभारणी करण्याची मागणी होत आहे. पालखी रथालाही या अशास्त्रीय गतिरोधकांचा अडथळा निर्माण होऊ शकतो. या गतिरोधकांची रस्त्यापासूनची उंची व रुंदी जास्त असल्याने वाहने आदळत असून, वाहनांचे नुकसान होत आहे.
भुयारी मार्गाचे काम अपूर्ण
४साई मंदिराजवळील भुयारी मार्गाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. रस्त्याची खोदाई, रंगरंगोटी, पथदिव्यांची कामे बाकी आहेत. येथील बीआरटीएस रस्त्यावर पथदिव्याचे खांब उभारण्यात आले आहेत; मात्र त्याला वीजपुरवठा नसल्याने पथदिवे बंद आहेत. रस्त्यावर केबल पडून आहे. बीआरटीएस मार्ग पूर्णपणे तयार नसल्याने वाहतुकीस खुला करण्यात आलेला नाही.
सिमेंटचे शिल्प एकाच रंगात
४साई मंदिराजवळील उड्डाणपुलाचे सुशोभीकरण झाले असल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र हा उड्डाणपूल उभारताना दिंडीचे छायाचित्र असलेले सिमेंटचे ब्लॉक वापरण्यात आले आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूंना ठरावीक अंतरावर लावलेले हे सिमेंटचे ब्लॉक आहे तसेच पांढºया रंगात ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सौंदर्यीकरणासाठी वापरात आणलेल्या या ‘ब्लॉक’चा उद्देश साध्य होत नाही. एकाच रंगात असल्याने कशाचे शिल्प आहे ते पटकन लक्षात येत नाही. त्यामुळे कामाच्या घाईत प्रशासन असे निर्णय घेऊन काम उरकायच्या मागे लागली असल्याचे बोलले जात आहे.
आळंदी-दिघी पालखी मार्गावरील ९५ टक्के कामे संपली आहेत. केवळ पाच टक्के कामे प्रलंबित आहेत. सोहळा जवळ आल्याने कामे लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत. उड्डाणपुलाला वापरण्यात आलेले दिंडीचे शिल्प असलेले सिमेंटचे ब्लॉक पांढºया रंगात ठेवण्याचा निर्णय झाला आहे. पालखी मार्गावरील उर्वरित कामे संपवून वारकºयांसाठी यंदा पालखी मार्ग सुकर होईल.
- ज्ञानेश्वर जुंधारे, कार्यकारी अभियंता,
स्थापत्य विभाग (बीआरटीएस), महापालिका