पाऊस ओसरल्याने पुराचा धोका टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 02:47 AM2017-07-24T02:47:25+5:302017-07-24T02:47:25+5:30
शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पावसाचा अंदाज घेऊन धरणातील पाणी इंद्रायणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पावसाचा अंदाज घेऊन धरणातील पाणी इंद्रायणीत सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मावळचे तहसीलदार रणजित देसाई यांनी शनिवारी दिला होता. आज पावसाचा जोर ओसरल्याने तूर्तास पुराचा धोका टळला असून, नदीकाठच्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
टाटा कंपनीच्या लोणावळा धरणातून भिवपुरी येथील वीजनिर्मिती केंद्राला पाणी सोडण्यात येते. मात्र, खोपोली व रायगड जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने बहुतांश नद्यांना पूर आला असल्याने लोणावळा धरणातील पाणी रायगड जिल्ह्यात न सोडता लोणावळ्यातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीत सोडण्यात येणार असल्याचे पत्र शनिवारी टाटा कंपनीने मावळ प्रशासनाला दिले आहे. या पत्राचा हवाला देत तहसीलदार देसाई यांनी पोलीस व प्रशासकीय यंत्रणांना पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यास नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे, असे सूचित केले होते. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिसराला पुराचा विळखा बसण्याची शक्यता निर्माण झाली होती.
सुदैवाने रविवारी जोर ओसरल्याने तूर्तास हा धोका टळला आहे. इंद्रायणी नदीपात्राला आलेला पूरदेखील ओसरल्याने पाण्याखाली गेलेले पूल पुन्हा वाहतुकीसाठी मोकळे झाले आहेत.
आंदर, नाणे मावळात
बत्ती गुलमुळे हाल
टाकवे बुद्रुक : आंदर मावळामध्ये गेल्या आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही गावांत बत्ती गुलमुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत.
आंदर मावळाला वीजपुरवठा करणारे सब स्टेशन बेलिज येथे असून, येथूनच खांड ते सावळा या भागातील गावाना वीजपुरवठा केला जातो. परंतु वीजप्रवाह कमी-जास्त होत असल्याने ठिकठिकाणचे डी. पी. स्वीच ड्रिप होऊन वीजपुरवठा खंडित होत आहे. तक्रार करूनही महावितरणचे कर्र्मचारी दखल घेत नसल्याचे नागरिक सांगत आहेत.
चार दिवस माऊ, वडेश्वर, नागाथली, शिंदेवाडी, वहानगाव, कुसवली, डाहुली, कुसूर, खांड, सावळा, माळेगाव, पारिठेवाडी, अनसुट, किवळे, कशाळ, भोयरे आदी गावांत वीजपुरवठा खंडित आहे. संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, वेगवेगळी कारणे सांगून दोन तासांत वीजपुरवठा सुरू होईल, अशी उत्तरे दिली जातात. वीज गायब असल्याने स्थानिकांना भर पावसात पाण्यासाठी फिरावे लागत आहे. पीठ गिरण्या बंद असल्याने २० कि.मी. दूर जाऊन दळण आणावे लागत आहे. मोबाइल चार्ज नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
ंकामशेत परिसरात आठवड्यानंतर झाले सूर्यदर्शन
कामशेत : गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मावळातील सर्व ठिकाणी पाणी झाले होते. त्यात गुरुवारपासून पावसाचा जोर वाढून इंद्रायणी नदीला पूर आल्याने शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी रात्रीपर्यंत नाणे रस्ता, सांगिसे पूल पाण्याखाली गेले होते. ठिकठिकाणी पाणी साचून रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. त्यामुळे नाणे मावळातील २० ते २५ गावांचा व सांगिसे पुलापलीकडील आठ गावांचा संपर्क तुटला होता. पण रविवारी पावसाने उघडीप दिल्याने पाणी ओसरल्याने जनजीवन सुरळीत झाले आहे. नागरिकांची ये-जा सुरू झाली.
रविवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने जनजीवन सुरळीत झाले असून, अडकून पडलेले पर्यटक व नागरिक सुखरूप त्यांच्या घरी परतले आहेत. एक आठवड्यानंतर रविवारी प्रथमच सूर्यनारायणाने काही काळ दर्शन दिले.
मावळ तालुक्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याने तसेच लोणावळा येथील धरणे, वडिवळे धरण पूर्ण भरल्याने मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदीला पूर आला होता. यात सांगिसे पूल, कामशेतचा जुना पूल, शिवाय नाणे रस्ता पाण्याखाली गेल्याने पश्चिम भागातील नदीच्या पलीकडील गावांचा संपर्क तुटला होता. शनिवारचा संपूर्ण दिवस या भागांमध्ये पाणी असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पर्यटक ठिकठिकाणी अडकून पडले होते. नोकरदार, दूध व्यावसायिक व विद्यार्थी कामशेत येथे अडकले होते.