पावसामुळे रस्ते पाण्याखाली, थेरगावातील घरे, दुकानांमधील साहित्य भिजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 01:59 AM2018-06-23T01:59:21+5:302018-06-23T01:59:34+5:30
अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांचे एका दिवसात पावसाने तोंडचे पाणी पळविले. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने थेरगावमधील नागरिकांची व वाहनचालकांची धांदल उडवली.
थेरगाव : अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांचे एका दिवसात पावसाने तोंडचे पाणी पळविले. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने थेरगावमधील नागरिकांची व वाहनचालकांची धांदल उडवली. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी तीन वाजता आकाशात ढगांची गर्दी वाढली. त्यामुळे परिसरात आकाश अंधारून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. थेरगावमधील प्रत्येक रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचे लोंढे वाहत होते.
गणेशनगर येथील शिव कॉलनीत गुडघाभर पाणी साठल्याने रहिवाशांना काही तास घराच्या बाहेर पडणे मुश्कील झाले होते. येथील उधारे यांच्या घरात ड्रेनेजचे मैलामिश्रित पाणी शिरल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागली. गणेशनगर येथील पंचशील कॉलनी क्रमांक दोनमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. आदर्श कॉलनीतील नंदकुमार धुमाळ यांच्या घरात गुडघाभर पाणी साठल्याने या कुटुंबीयांची मोठी वाताहत झाली.
दगडू पाटीलनगर येथे ‘ग’ प्रभाग कार्यालयाजवळ कंबरे इतके पाणी साठल्याने संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्यावर शाळेची बस, चारचाकी वाहने या तलावात अर्धी बुडाली होती. यानंतर येथील नगरसेवक कैलास बारणे सहकाºयांसह स्वत: पाण्यात उतरले. साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी चेंबरची झाकणे उघडली. त्यामुळे रस्त्यावरील पाणी कमी झाले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर पावसाळी पाण्याच्या वाहिन्यांची दुरवस्था झाली आहे. या वाहिन्यांच्या चेंबरवरील जाळ्या आणि झाकणे तुटलेली तर त्यात कचरा अडकून पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होत आहे. पावसाळ्यापूर्वीच या चेंबरची आणि त्यावरील जाळ्यांची दुरुस्ती करणे आवश्यक होते. महापालिका आयुक्तांनी तसे आदेशही दिले होते. मात्र, महापालिका प्रशासनाने त्या आदेशानुसार कार्यवाही केली नाही. ेचेंबरच्या जाळ्यांची दुरुस्ती केवळ कागदोपत्री दाखविण्यात आले. परिणामी रस्त्यावर पाणी साचले.
>आठ दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान
१६ नं. येथे पावसामुळे अक्षय पार्क या व्यावसायिक इमारतीत तळ मजल्यात असलेल्या आठ दुकानांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले. अचानक जोरदार आलेल्या पावसामुळे साहित्य हलविण्यास देखील वेळ मिळाला नाही. ऐनवेळी प्रभाग सदस्य संदीप गाडे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते किशोर सकुंडे, मोहन पांचाळ, अनुराग कांबळे, भरत शिंदे, दिलशाद खान यांनी येथील व्यावसायिकांना मदत करून साहित्य इतरत्र हलविले; मात्र येथील बीआरटीएस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली. येथील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर जेसीबीने रस्त्यामधील चेंबर फोडून पाणी जाण्यास मार्ग मोकळा केला. त्यानंतर काही वेळात रस्त्यावरील पाणी ओसरले व वाहतुकीस मार्ग मोकळा झाला.