वडिवळे धरणात पावसाळ्यापर्यंतचा मुबलक पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:27 AM2019-04-03T00:27:25+5:302019-04-03T00:27:37+5:30
पाटबंधारे विभागामार्फत धरणाच्या पाणी साठ्याचे मंजूर प्राथमिक सिंचन आराखड्यानुसार नियोजन केले असल्याने पाणी टंचाईची समस्या उद्भवणार नाही,
कामशेत : नाणे मावळातील वडिवळे धरणातून अनेक गावांना तसेच या धरणाचे पाणी इंद्रायणी नदीच्या माध्यमातून अनेक शहरे व गावांपर्यंत पोहोचत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून, दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. वडिवळे धरण प्रकल्पात मात्र पावसाळ्यापर्यंतचा मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.
पाटबंधारे विभागामार्फत धरणाच्या पाणी साठ्याचे मंजूर प्राथमिक सिंचन आराखड्यानुसार नियोजन केले असल्याने पाणी टंचाईची समस्या उद्भवणार नाही, अशी माहिती वडिवळे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी दिली. मावळासह अनेक भागात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता मागील वर्षीपेक्षा जास्त वाढू लागल्याने अनेक ठिकाणचे पाणी साठे कमी होण्याची स्थिती असताना नाणे मावळातील वडिवळे धरण मंगळवारपर्यंत ( दि. २) ५४.९५ टक्के भरलेले असून, या धरणाचा एकूण पाणी साठा २७.१८ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. त्यातील उपयुक्त पाणी साठा १६.७० दश लक्ष घन मीटर इतका आहे.
धरणातून मौजे गोवित्री ते देहू पर्यंत कुंडलिका व इंद्रायणी नदीमध्ये पाणी सोडून शेती प्रयोजनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठीचे जुलै महिन्यापर्यंतचे नियोजन असल्याची माहिती खाडे यांनी दिली. शिवाय मागणीनुसार वेळोवेळी शेतीसाठी व पिण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने परिसरातील नद्या तसेच इंद्रायणी नदीच्या पाणी पातळी योग्य असल्याने त्याचा उपयोग नदीकिनारी असलेल्या अनेक गावांना होणार आहे. वडिवळे धरणाच्या पाण्यावर नाणे मावळातील महत्त्वाची गावे गोवित्री, काम्ब्रे, नाणे या गावांसह कामशेत, कान्हे, वडगाव, तळेगाव, इंदोरी, देहू, चºहोली, निघोजे, चिंबळी, आळंदी, वडगाव शिंदे व तुळापूर आदी महत्त्वाच्या गावांसह आजूबाजूच्या छोट्या-मोठ्या गावांना पिण्याचा पाणी पुरवठा, तसेच शेतीच्या सिंचनासाठी फायदा होत आहे. या धरणाच्या पाण्यावर अनेक गावांमधील शेती क्षेत्र सिंचनाखाली येत असून, धरणातील पाणीसाठा मुबलक असल्याने इंद्रायणी नदीतीरावरील गावांना तरी पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. आॅक्टोबरअखेरपर्यंतचे उन्हाळी हंगामाचे पिण्याचे पाणी नियोजन करूनही धरणामध्ये उपयुक्त पाणी साठा शिल्लक राहणार असल्याची माहिती धरण प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली.