शाळांच्या इमारती झाल्या धोकादायक, विद्यार्थी जीव धोक्यात घालून घेताहेत शिक्षण; दुरुस्ती, देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 03:02 AM2017-09-15T03:02:13+5:302017-09-15T03:02:17+5:30
देहूरोड : कॅन्टोन्मेंट शाळांमध्ये एकीकडे ई-लर्निंगसारखे विविध प्रयोग तसेच शाळांतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याचा प्रयत्न करीत आहे. शाळांमध्ये विविध संकल्पना राबवून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शाळांचा विकास आराखडा बनवून दोन वर्षे होत असताना दुसरीकडे सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिकत असलेल्या बोर्डाच्या विविध शाळांची दुरुस्ती व देखभाली अभावी दुरवस्था झाली आहे. फुटलेले पत्रे, गळके छप्पर असलेले विविध वर्ग, पावसाचे पाणी भिंतीत मुरून ओल्या झालेल्या भिंती, भिजून काही ठिकाणी फुगलेल्या भिंती, भेगा पडलेल्या भिंती, शाळेला संरक्षक भिंतीचा अभाव, खचलेला वरंडा, फुटलेल्या फरशा, पिण्यासाठी पाण्याचा अभाव, स्वच्छतागृहांत पाण्याचा अभाव, शाळा व वर्गखोल्या इमारतीची रखडलेली रंगरंगोटी अशा विविध समस्यांच्या गर्तेत विद्यार्थी आणि शिक्षक अडकले असल्याचे चित्र पाहणीत दिसून आले.
उर्दू व हिंदी शाळा, देहूरोड बाजारपेठ
महात्मा गांधी हिंदी व डॉ. झाकिर हुसेन प्राथमिक शाळेच्या इमारतीची मागील बाजूची एक भिंत गेल्या वर्षी कोसळल्यानंतर त्या शेजारच्या एका भिंतीचा काही भाग पुन्हा कोसळला आहे. वर्गाच्या भिंतीत पावसाचे पाणी येत असून भिंतीला तडेही गेले आहेत. या शाळेचे बांधकाम खूप जुने झाले असून शाळा इमारतीच्या बहुतांशी भिंतीत पावसाचे पाणी येत आहे. त्यामुळे अगोदरच अतिशय जीर्ण भिंती कधीही कोसळण्याची शक्यता आहे. या इमारतीच्या बाहेरील बाजूने असलेल्या अनेक खिडक्यांचे सिमेंट स्लॅब कोसळले असून काही ठिकाणी कोसळण्याची शक्यता आहे. काही वर्गांच्या छताचे पत्रे फुटले आहेत. अनेक वर्ग गळत आहेत. विविध ठिकाणी वासे जीर्ण झालेले आहेत. शाळेच्या भिंतीलगत अवजड वाहने, भाजी मंडईचे वाहनतळ तसेच हातगाड्या उभ्या राहत असल्याने विद्यार्थी त्रस्त आहेत. गेल्या वर्षी पाडण्यात आलेल्या एका शाळेच्या खिडक्या, दारे व राडरोडा शेजारी पडलेला असल्याने विद्यार्थ्यांना अपघात होण्याची शक्यता आहे.
संत तुकाराम शाळा, झेंडेमळा
झेंडेमळा येथील संत तुकाराम प्राथमिक शाळेची सिमाभिंत विविध ठिकाणी पडलेली असून शाळेचे कार्यालय मोडकळीस आले आहे. कार्यालयाच्या पत्र्यांवर झुडपे उगवली आहेत. शाळेच्या मागील बाजूस पावसामुळे झाडेझुडपे उगवली असून दलदल झाली आहे. जिन्याची भिंत पडलेली आहे. शाळा इमारत अत्यंत जुनी झाली असून, दुरुस्तीची प्रतीक्षा आहे. एक वर्ग खोली वगळता सर्व वर्गात पावसाचे पाणी येऊन भिंती ओल्या झाल्या आहेत. काही भिंतींना भेगा पडल्या आहेत. काही ठिकाणी पत्र्यातून पाणी येत आहे. स्लॅबच्या दोन वर्ग खोल्या असून त्यात पावसाचे पाणी येते. स्लॅब गळत आहे. विद्यार्थी व शिक्षकांसाठीच्या स्वच्छतागृहातून दुर्गंधी येते. स्वच्छतागृहात नळाचे पाणी येत नाही. पाण्याची मोटार लावण्याची गरज आहे. मुलींच्या एका स्वच्छतागृहाला दरवाजा नाही तर दुसºयाचे लागत नाहीत. शाळेसमोरील नळाला नियमित पाणी येत नसल्याने विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणीही रखवालदारामार्फत झेंडेमळ्यातील रहिवाशांकडून अनेकदा आणावे लागते
कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळा, चिंचोली
चिंचोली येथील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळेची इमारत फारशी जुनी नसल्याने मोठ्या समस्या नाहीत. मात्र, येथील शाळेच्या सभागृहाच्या इमारतींच्या भिंतींना तडे गेले आहेत. गेल्या काही वर्षांत रंगरंगोटी झालेली नाही. स्लॅबला तडे गेले आहेत. मुख्य इमारतीच्या स्लॅबमधून तीन ठिकाणी पावसाचे पाणी गळत आहे. बांधकाम केल्यापासून उत्तरेकडील भिंतीला सिमेंट गिलावाच केलेला नाही. त्याच भिंतींच्या पायातील दगडांमधील सिमेंट निघाले असून तो भाग पोखरल्यासारखा दिसत आहे. त्यामुळे भिंतीला धोका होण्याची शक्यता आहे. ‘पुढे शाळा आहे’ हा मार्गदर्शक फलक रस्त्यालगत लावणे गरजेचे असताना तो शाळेच्या सिमा भिंतीजवळ पडला आहे.
स्वामी विवेकानंद शाळा, शेलारवाडी
शेलारवाडी येथील बोर्डाच्या स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, धोकादायक इमारतीत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आवारातील दुसºया इमारतीत अंगणवाडी भरविली जाते. भिंतीला भेगा पडल्याने व गळतीमुळे एक खोली बंद आहे. बालवाडीचे विद्यार्थी वºहांड्यात शिक्षण घेतात. स्लॅबला ओलावा असल्यामुळे इमारतीला धोका होऊ शकतो. दुसºया जुन्या इमारतीचीही दुरवस्था असून, फुटलेले सिमेंट पत्रे बदलले नाहीत. पावसाच्या पाण्याने भिंतीं ओल्या होऊन तडे गेले आहेत. फुटक्या पत्र्यांवर प्लॅस्टिक कागद टाकला असला तरी पावसाचे पाणी येतच आहे. काही ठिकाणी पत्रे कधीही खाली कोसळू शकतील अशी भयावह स्थिती आहे. मागील बाजूला सरंक्षक भिंत दुरवस्थेत आहे. शौचालयांचे दरवाजे व्यवस्थित लागत नाहीत.
म. गांधी शाळा, एम. बी. कॅम्प
महात्मा गाधी विद्यालय व इंग्रजी माध्यम शाळा इमारतीला उन्हाळ्यात लाखो रुपये खर्चून रंगरंगोटी केली असतानाही रंगावर
काळे डाग पडले आहेत. पत्र्यांवरून येणारे पाणी थेट भिंतीत मुरत असल्याने तसेच पावसाचे पाणी भिंतीवर येते. परिसरात विविध ठिकाणी झोपड्या व जडीबुटीवाले यांची पाले आहेत. शाळेला सीमाभिंत नसल्याने देहूरोड व विकासनगर भागात
ये-जा करणारे नागरिकांची शाळेसमोरून वर्दळ असते.
किन्हई येथील मराठी शाळेत समस्या नसल्या तरी प्रवेशद्वारासमोर मुख्य रस्ता असल्याने पुढे शाळा आहे, असा फलक लावणे गरजेचे आहे.
महात्मा फुले शाळा, मामुर्डी
मामुर्डी येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेच्या कार्यालयात विविध ठिकाणी पावसाचे पाणी येत आहे. अनेक वर्गांच्या भिंतीत पाणी येत असल्याने भिंतींना धोका पोहचण्याची शक्यता आहे. खिडक्यांचे स्लॅब पडण्याची स्थितीत आहेत. सीमाभिंत पडली आहे. शाळेतील शौचालयाचा वापर बाहेरचे नागरिक करीत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. शाळेशेजारून जाणारी गटार दुरवस्था झाल्याने तसेच शेजारी असलेली कचरा कुंडी नियमित उचलली जात नसल्याने विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. शाळेसमोरच्या मुख्य रस्त्यावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यात वाहत येणारे सांडपाणी साचत आहे. शितळानगर भागातून सांडपाणी शाळेच्या समोर रस्त्यालगत वाहत येत आहे. शाळेला रंगरंगोटी करण्याची गरज आहे.
शेलारवाडी मराठी शाळेसाठी नवीन इमारत बांधण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर बोर्डाने मंजुरी दिली आहे. शाळेची जागा लष्करी मालकीची असल्याने (ए वन लॅण्ड) या ठिकाणी कायमस्वरूपी बांधकाम करण्यास प्रतिबंध केला असल्याने या ठिकाणी आता मॉड्युलर पद्धतीने शाळा उभारण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. - रघुवीर शेलार, स्थानिक सदस्य, देहूरोड कॅन्टोन्मेन्ट
देहूरोड बाजारपेठेतील महात्मा गांधी हिंदी व डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा इमारत जुनी झाल्याने दुरवस्था झाली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही शाळा या महिन्यात एमबी कॅम्प येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या मोठ्या इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहेत. - विशाल खंडेलवाल,
उपाध्यक्ष, देहूरोड कॅन्टोन्मेन्ट
शेलारवाडी व किन्हई येथील शाळा नव्याने बांधकाम करण्यास लष्करी विभागाकडून परवानगी मिळत नसल्याने मॉड्युलर पद्धतीच्या वर्गखोल्या उभारण्यास मान्यता दिली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच दोन-तीन महिन्यांत गैरसोय दूर होईल. - अभिजित सानप, मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेन्ट