आयटी नगरीतील सांडपाण्याने माणच्या ओढ्याची गटारगंगा, ओढ्याचे अस्तित्व धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 01:05 AM2019-02-08T01:05:35+5:302019-02-08T01:06:03+5:30
मुळशी तालुक्यातील माण गावचे वैभव व प्रमुख आकर्षण असलेला तसेच एकेकाळी स्वच्छ पाण्याने ओसंडून भरून वाहणाऱ्या गावातील मुख्य ओढ्याची सद्य:स्थितीत दुर्दशा झाली आहे.
- रोहिदास धुमाळ
हिंजवडी : मुळशी तालुक्यातील माण गावचे वैभव व प्रमुख आकर्षण असलेला तसेच एकेकाळी स्वच्छ पाण्याने ओसंडून भरून वाहणाऱ्या गावातील मुख्य ओढ्याची सद्य:स्थितीत दुर्दशा झाली आहे. आयटीनगरीतील काही कंपन्या आणि व्यावसायिकांकडून कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट या नाल्यात सोडण्यात येते. कचरा, भाजीपाला, राडारोडा, मैलामिश्रित पाणीही या नाल्यात थेट सोडले जाते.
परिणामी या ओढ्याचे अक्षरश: गटार झाले आहे. याकडे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा ओढ्याचे अस्तित्वच संपुष्टात येईल, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
आयटीनगरी माणमधील भोईरवाडीतून उगम झालेला ओढा गावच्या मध्यवर्तीभागातून वाहतो. मुळा नदीला हा ओढा मिळतो. ओढ्याची रुंदी आणि पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे नदीसारखेच त्याचे पात्र विस्तीर्ण आहे. मात्र सध्या या ओढ्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण झाली आहे. आयटीपार्कच्या फेज ३ मधील काही कंपन्या, व्यावसायिकांकडून ओढ्यात बिनदिक्कत सांडपाणी सोडले जाते. ग्रामस्थ, रहिवासी सोसायट्यांचा कचरा, मैलामिश्रित पाणी यामध्ये सोडले जात असल्याने पिण्याच्या पाण्याचा नैसर्गिक स्रोत असलेल्या ओढ्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याबाबत ग्रामपंचायत कडून एमआयडीसी तसेच संबंधित कंपन्यांना अनेक वेळा पत्रव्यवहार झाला आहे मात्र ओढ्याची दुर्दशा कायम आहे यावर तातडीने काही उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा लवकरच माणचे वैभव आणि ओळख असलेल्या गालओढ्याचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असे स्थानिक ग्रामस्थांचे मत आहे.
दुथडी भरून वाहणारा ओढा गावचे प्रमुख आकर्षण होता. आयटीपार्कमुळे परिसराचा कायापालट झाला. कंपन्या, उद्योग व्यवसाचे जाळे या भागात विस्तारले. अल्पावधीतच गावची लोकसंख्या कितीतरी पटीने वाढली. मात्र काही ठिकाणी पायाभूत सुविधांची कमतरता असल्याने मैलामिश्रित आणि सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट या ओढ्यामध्ये सोडले जात आहे.
फेज २ हद्दीतील काही कंपन्यांकडून सांडपाणी बाहेर सोडले जात असल्याची बाब निदर्शनास येताच ग्रामपंचायतकडून संबंधित कंपन्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सांडपाण्याबाबत दक्षता घेण्यासंदर्भात ग्रामपंचायतने या पत्रांतून नमूद केले आहे.
बोडकेवाडीकरांचे आंदोलन
फेज २ च्या हद्दीत बोडकेवाडी आहे. येथे काही कंपन्यांतील सांडपाणी त्यांच्या संरक्षण भिंतीलगत साचत असल्याचे बोडकेवाडीतील ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. या सांडपाण्यामुळे बोडकेवाडीतील कूपनलिकांतीलही पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे बोडकेवाडीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित कंपन्यांच्या या सांडपाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी बोडकेवाडी ग्रामस्थांनी संबंधित कंपनीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले.
सांडपाण्यावर प्रक्रियेचा कंपन्यांकडून दावा
माण ग्रामपंचायतकडून करण्यात आलेल्या पत्रव्यवहाराला कंपन्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दूषित अथवा सांडपाणी कंपनी बाहेर सोडले जात असल्याची शक्यता संबंधित कंपन्यांनी यातून फेटाळली आहे. नियमानुसार आमच्याकडे स्वत:चे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असून, सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया करून वापरण्यास योग्य असलेले पाणी झाडे, उद्यान आणि
अन्य कारणांसाठी वापरात येते. प्रक्रिया केल्यानंतरही वापरण्यास अयोग्य असलेल्या पाण्याचे बाष्पीभवन
करून त्याची विल्हेवाट लावण्यात येते, असा दावा संबंधित कंपन्यांनी माण ग्रामपंचायतला दिलेल्या पत्रांतून
केला आहे.
एमआयडीसीच्या अखत्यारीत हा विषय आहे. त्यांनी पूर्ण चौकशी करून वस्तु:स्थिती पहायला पाहिजे. कंपनी नियमांचे सर्वांनी काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. कंपनीचे स्वत:चे एसटीपी प्लांट असतात. त्यामुळे बाहेर दूषित पाणी सोडले जाण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र कोणाकडून असे होत असेल तर ते चुकीचे आहे.
- कर्नल चरणजितसिंग भोगल (निवृत्त),
मुख्य कार्यकारी अधिकारी,
हिंजवडी इंडस्ट्रीअल असोसिएशन
माण परिसर मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. मैलामिश्रित पाणी, सांडपाणी, कचरा थेट ओढ्यात सोडणे पर्यावरणास घातक आहे. ओढ्याची अशी अवस्था होणे गंभीर बाब आहे. यावर आळा घालण्यासाठी लवकरच ग्रामपंचायतकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
- भरत पाटील,
ग्रामविकास अधिकारी, माण
कंपन्यांकडून बाहेर मोकळ्या जागेत दूषित अथवा सांडपाणी सोडले जात असेल तर हा विषय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे याबाबत काहीही माहिती देता येणार नाही.
- संतोषकुमार देशमुख, प्रादेशिक अधिकारी-२, एमआयडीसी
ओढ्यामधे सांडपाणी आणि कचºयाचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात असल्याने प्रचंड दुर्गंधी होते. डासांचे प्रमाण वाढले असून रोगराई पसरण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.
- किसन ठाकर, ग्रामस्थ ठाकरवस्ती, माण
ओढ्याच्या कडेलाच आमचा पूर्वीपासून व्यवसाय आहे. कुंभारकामासाठी ओढ्याचे पाणी वापरले जायचे. ग्रामस्थसुद्धा कपडे धुण्यासाठी, जनावरांना पिण्यासाठी ओढ्याचे पाणी वापरत असत. सध्या मात्र ओढ्याचे गटार झाले आहे. दुर्गंधी झाली असून ओढ्याचे अस्तित्व धोक्यात आहे.
- बाळासाहेब कुंभार, ग्रामस्थ, कुंभारवाडा, माण