देहूगावात विद्युतवाहक तार तुटल्याने दोन एकरावरील ऊस जळून खाक; ४ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 05:52 PM2017-12-07T17:52:43+5:302017-12-07T17:55:18+5:30
सांगुर्डी (ता. खेड) येथील तोडणीसाठी तयार असलेला दोन एकर ऊस उच्च विद्युतवाहक तार तुटल्याने जळून खाक झाल्याने सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
देहूगाव : सांगुर्डी (ता. खेड) येथील तोडणीसाठी तयार असलेला दोन एकर ऊस उच्च विद्युतवाहक तार तुटल्याने जळून खाक झाल्याने सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज (गुरूवार, दि. ७) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
सांगुर्डी गाव गेल्या काही वर्षांपासून ऊस पिकाचे आगार म्हणून ओळखले जात आहे. येथील महादू दामू भसे व धोंडीराम दामू भसे या शेतकऱ्यांचा हा ऊस होता. धोंडीराम भसे यांनी दिलेल्या माहितीनुसार ऊस सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शेतातून गेलेल्या उच्च दाबाची विद्युतवाहक तार तुटली व त्यामुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ऊसाला आग लागली. या ऊसाला आगलेली आग एवढी भयानक होती की आगीच्या ज्वाळा दूरवर दिसत होत्या. त्यातच विद्यूत वाहक तारेतून विद्यूत प्रवाह सुरू होता. त्यामुळे शेतात शिरून आग विझवणे धोक्याचे होते. डोळ्यासमोर ऊस जळत होता, मात्र हातावर हात ठेऊन पाहण्यापेक्षा काहीही करता येत नव्हते. हा ऊस सुरूचा ऊस असून कासारसाई येथील श्री संत तुकाराम कारखान्याला घातला जातो. ऊसाची वाढ पूर्ण झाली पासून टोळी मिळाल्यानंतर हा ऊस कारखान्यात पाठविण्यात येणार होता. त्याअधीच ही घटना घडल्याने मोठे नुकसान झाले आहे. ही घटना विद्यूत विभागाला कळविली मात्र तोपर्यंत संपूर्ण दोन एकर ऊसाला आगीने वेढले होते. या आगीमुळे सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसाने झाल्याचे त्यांनी सांगितले. याच शेतकऱ्यांच्या शेतात विद्यूत रोहित्र असल्याने ही आग या रोहित्रापर्यंत आली असती तर मात्र मोठा धोका झाला असता. काही वेळानंतर वायरमन आले व त्यांनी विद्यूत पुरवठा खंडीत करून तुटलेली तार जोडून घेतली.
ही आग साधारण दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विझली. त्यानंतर विद्यूत वाहक तारा तुटल्याने शॉर्ट सर्किट झाल्याने लागलेल्या आगीची गेल्या महिना भरातील ही दुसरी असल्याचे येथील शेतकरी अर्जुन भसे यांनी सांगितले. या पूर्वी येथील शेतकरी हनुमंत गोविंद येळवंडे, शांताराम गणपत भसे, संजय बळीराम भसे, सुदाम भिकाजी भसे यांचा जवळपास वीस एकर ऊस असाच विद्यूत वाहत तार तुटल्याने झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागुन मोठे नुकसान झाले होते.
अशा घटना येथे वारंवार घडत असून याची माहिती विद्यूत विभागाला देऊनही योग्य दखल घेतली जात नसल्याने येथील शेतकरी त्रस्त झाल्याचे भसे यांनी सांगितले. या भागातील तारा याा अत्यंत जुन्या झाल्याने अशा घटना वारंवार घडत आहे. घटना घडल्यानंतरही विद्यूत विभागाचे कर्मचारी तातडीने दखल घेत नसून काम करण्याची टाळाटाळ करीत असून आम्ही महापारेषण कंपनीकडे नुकसान भरपाई मागणार असल्याचे भसे यांनी सांगितले. या घटनेची कल्पना येथील तलाठी शिरीष आचारी यांनी कळविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी भ्रमणध्वनीला कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे सांगत ते दुपारी चार वाजेपर्यंतही शेतावर पंचनामा करण्यासाठी आले नसल्याने येथील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. विद्यूत विभागाच्या कर्मचाऱ्यांना येथील विद्युतवाहक तारा वारंवार बदलण्यासंदर्भात मागणी केली असूनही ते दखल घेत नाहीत तर येथील तलाठी या अधिकाऱ्यांनी अशा गंभीर घटनेची दखल घेतली नसल्याने त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही येथील शेतकऱ्यांनी केली आहे.