दमदार पावसामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 05:58 PM2018-07-07T17:58:21+5:302018-07-07T18:03:29+5:30
इंद्रायणी नदीवरील सांगिसे पूल पावसामुळे पाण्याखाली गेला असून महत्वाच्या आठ गावांचा संपर्क तुटला आहे.
लोणावळा : मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या पाणीसाठ्यात सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात पवना धरण क्षेत्रात १३२ तर लोणावळा शहरात १५१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु असलेला जोरदार पाऊस शुक्रवारी देखील कायम राहिला. त्यामुळे पवना धरणात ३१.९२ टक्के पाणीसाठा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिवळे गावातील इंद्रायणी नदीवरील सांगिसे पूल पावसामुळे पाण्याखाली गेला असून महत्वाच्या आठ गावांचा संपर्क तुटला आहे. वडीवळे, सांगिसे, बुधवडी, वळकं, वेल्हवळी, नेसावे, खांडशी, उंबरवाडी या आठ गावांना जोडणारा हा पूल असून या गावांचा दळणवळणाचा महत्वाचा मार्ग आहे. येथील अनेक भागात फुलांच्या कंपन्या व इतर उद्योगधंदे असल्याने मोठी मालवाहतूक वाहने या पुलावरून होत असते.
पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठया प्रमाणात वाढ झाल्याने शनिवारी सकाळपासून मावळातील गहुंजे-साळुंब्रे गावांना जोडणाऱ्या साकव पुल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी , विद्यार्थी व कामगार वर्गाची मोठी गैरसोय झाली आहे. पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असल्याने वारी सकाळी घराबाहेर पडलेल्या शेतकरी व कामगारांना ९-१० किलोमीटरचा वळसा घालून जावे लागले. शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची पायपीट वाढली आहे.
त्याप्रमाणे शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी लोणावळ्यात पर्यटन व वर्षाविहारा करिता येणाऱ्या पर्यटकांनी डोंगरभागात धबधब्याच्या खाली जाऊन बसण्याचे टाळावे, धरणांचा पाणीसाठा वाढलेला असल्याने पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करु नये, लायन्स पॉईट याठिकाणी पावसाच्या सोबतच धुके व हवा मोठ्या प्रमाणात असल्याने कोणीही सुरक्षा रेलिंगच्या पुढे दरीच्या टोकापर्यत जाऊ नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.