उन्हामुळे त्वचारुग्णांमध्ये होतेय मोठ्या प्रमाणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 02:41 AM2019-03-14T02:41:37+5:302019-03-14T02:43:11+5:30

सध्या मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाचा चांगलाच चटका जाणवू लागला आहे. त्यामुळे आजारांमध्येही वाढ झाली आहे.

Due to sunlight, there is a large increase in bouts | उन्हामुळे त्वचारुग्णांमध्ये होतेय मोठ्या प्रमाणात वाढ

उन्हामुळे त्वचारुग्णांमध्ये होतेय मोठ्या प्रमाणात वाढ

Next

पिंपरी : उन्हाळा सुरू झाला की त्वचारुग्णांमध्ये वाढ होते. सध्या मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाचा चांगलाच चटका जाणवू लागला आहे. त्यामुळे आजारांमध्येही वाढ झाली आहे. रुग्णालयातील १००पैकी सरासरी ४० ते ५० रुग्णांना त्वचेच्या विविध आजारांनी ग्रासले आहे.

अनुभवी त्वचारोग तज्ज्ञाकडून उपचार न केल्यास गजकर्ण पसरण्याची शक्यता असते. नागरिकांना सर्वांत जास्त जांघेत खाजेचा त्रास असतो. यावर त्वरित उपचार न केल्यास आजार वाढत जातो. त्वचेवर लाल चट्टे पडतात. तसेच हातांच्या बोटांवरही काळपटपणा येतो. त्वचारोग झाल्यास अनेकदा स्टेरॉइडमिश्रित मलमचा वापर रुग्ण प्राथमिक स्वरूपात करतात. तज्ज्ञांच्या मते त्या क्रीमचा वापर टाळायला हवा.

त्वचारोगावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ४० ते ५० रुग्ण फंगल इन्फेक्शनने बाधित असतात. उन्हाळ्यामध्ये ही आकडेवारी आणखी वाढते. अनेक रुग्ण उपचार म्हणून मेडिकलमधून स्टेरॉइडमिश्रित क्रीम वापरतात. मात्र तो घातक ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. उपचार सुरू केल्यानंतर त्यामध्ये सातत्य ठेवले पाहिजे. सातत्याने उपचार घेतला की हा आजार लवकर बरा होतो. उन्हाळ्यामध्ये शरीराला जास्त घाम येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
- डॉ. सुनील जॉन, त्वचारोगतज्ज्ञ,
तालेरा रुग्णालय

त्वचाविकाराची लक्षणे
त्वचारोगामुळे शरीरावर लालसर, खाजविणारे चट्टे येऊन ते गोल पसरत जातात. त्याला गजकर्ण असेही म्हणतात. ते नेहमी छातीवर, जांघेत, बगलेत आढळून येतात. गजकर्ण शरीरावर डोक्यापासून नखापर्यंत कोठेही होऊ शकते.
त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
नियमित आंघोळ करावी. ओले कपडे घालू नयेत. बाधित व्यक्तीचे कपडे, टॉवेल, चादर, कंगवा, साबण वापरू नये. सुती व सैैल कपडे वापरावेत. शरीरावर कुठे खाज येत असेल, तर त्वरित त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
स्टेरॉइडमिश्रित क्रीमचे दुष्परिणाम
पूर्वी गजकर्ण एखाद्या गोळीनेही बरे होत होते. आता अनेक दिवस उपचार घेऊनही गजकर्ण बरे होत नाही. अशा प्रकारच्या स्टेरॉइडमिश्रित क्रीमचा अतिवापर केल्याने गजकर्णच्या कारक फंगसमध्ये प्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे आढळून आले आहे.

Web Title: Due to sunlight, there is a large increase in bouts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.