जलवाहिनी फुटल्याने खचला रस्ता
By admin | Published: May 9, 2017 03:37 AM2017-05-09T03:37:51+5:302017-05-09T03:37:51+5:30
पिंपळे गुरव येथील बँक आॅफ महाराष्ट्र चौकातील मुख्य भूमिगत जलवाहिनी फुटल्याने रस्त्याला भेगा पडून रस्ता खचला. फुटलेल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपळे गुरव येथील बँक आॅफ महाराष्ट्र चौकातील मुख्य भूमिगत जलवाहिनी फुटल्याने रस्त्याला भेगा पडून रस्ता खचला. फुटलेल्या वाहिनीतून हजारो लिटर पाणी वायाला गेले. ही घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
दापोडीला पाणीपुरवठा करण्यासाठी पिंपळे गुरव येथून मुख्य भूमिगत जलवाहिनी नेण्यात आली आहे. ही जलवाहिनी फुटल्याने पाण्याच्या प्रेशरने रस्त्याला सुमारे २० फुटांपर्यंत भेगा पडून रस्ता खचला. बँक आॅफ महाराष्ट्रपासून पवनानगर क्रमांक १,२,३, तसेच श्री संत अभंग कॉलनीत अक्षरश: पाण्याचे तळे साचले होते. या परिसरातील अनेक घरांमध्येदेखील पाणी शिरले.
पवनानगर येथील चेंबर उघडल्याने रस्त्यावरील पाणी वाहून गेले. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत फुटलेल्या वाहिनीचा पाणीपुरवठा बंद केला.
दरम्यान, नवी सांगवी, कृष्णानगर येथे जलवाहिनी फुटल्याने पाणी वाया जात आहे. यासह हे पाणी आठ दिवसांपूर्वीच डांबरीकरण केलेल्या रस्त्यात मुरत असून, येथील डांबर उखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.