प्राधिकरणाच्या जागेत होतेय ‘डम्पिंग’
By admin | Published: May 23, 2017 05:05 AM2017-05-23T05:05:15+5:302017-05-23T05:05:15+5:30
भोसरी एमआयडीसी, तसेच इंद्रायणीनगर परिसरात प्राधिकरणाच्या मालकीच्या भूखंडावर दगड-माती, जुन्या इमारतींचे अवशेष अशा अनावश्यक बाबी
लोकमत न्यूज नेटवर्क
भोसरी : भोसरी एमआयडीसी, तसेच इंद्रायणीनगर परिसरात प्राधिकरणाच्या मालकीच्या भूखंडावर दगड-माती, जुन्या इमारतींचे अवशेष अशा अनावश्यक बाबी टाकण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे या जागांची ‘डंपिंग ग्राउंड’कडे वाटचाल सुरू झाली आहे. वेळीच या प्रकारांना आवर न घातल्यास प्राधिकरणाच्या जागा पूर्णत: राडारोड्यात हरवून बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्राधिकरणाच्या मालकीचे अनेक भूखंड एमआयडीसी स्पाईन रस्ता परिसर, सेक्टर ३, ४ व ५ येथे आहेत. यापैकी इंद्रायणीनगरजवळच्या भूखंडावर मुलांसाठी क्रिकेट व वाहन चालविण्याचे धडे या ठिकाणी घेतले जात होते. कित्येक जागांना संरक्षक भिंत नसल्याने अशा जागांवर अतिक्रमण होण्याचा धोका असल्याचे दिसून येते.
खंडेवस्ती भागात अशा प्रकारे अतिक्रमण करून ब-याचशा झोपड्या बांधल्या आहेत. या झोपड्यांमध्ये दारूविक्रीसारखे अवैध व्यवसाय चालत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. पण त्याकडे पोलीस व प्राधिकरण लक्ष देत नाही.
प्राधिकरणाच्या मैदानाला संरक्षक भिंत नसल्याने ठिकठिकाणी अनेक गुन्हेगारी कृत्ये झाली आहेत. स्पाईन रस्त्यालगत प्राधिकरणाच्या हद्दीतील मुरुमचोरीच्या घटना अजूनही सुरू असल्याचे दिसून येत आहे. तसेच या जागेचा वापर खासगी कंटेनर पार्किंग करण्यासाठी होऊ लागला आहे.