दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:35 PM2018-11-12T23:35:42+5:302018-11-12T23:36:00+5:30
चाकण पोलीसांची कारवाई : आरोपींकडून जबरी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस
चाकण : पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत एका संशयित इंडिका कारचा सिनेस्टाइलने पाठलाग करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोन आरोपींना चाकण पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. यातील तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव बापू राऊत (वय २०), अविनाश प्रकाश शिंदे (वय २४, दोघेही सध्या रा. चिखली, ता.हवेली, जि.पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी निघोजे येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पकडले.
११ तारखेला सायंकाळी निघोजे व शिंदे वासुली येथे चाकण पोलिसांनी नाकाबंदी केली असता एक पिवळ्या नंबर प्लेटची संशयित मोटार ही नाकाबंदी पाहून उलट दिशेने पळून गेली. यावेळी नाकाबंदीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर यांनी ही माहिती ग्रुपवर टाकली. यावेळी सहाय्यक निरीक्षक जगदाळे यांना इंदुरी ते सुदुंबरे रस्त्याने गाडी भरधाव वेगात जाताना दिसली. या गाडीचा पाठलाग करीत असताना वासुली गावच्या हद्दीत मोटार एनडीआरएफ च्या जवळील एका कंपनीच्या भिंतीला धडकली. त्यातील पाच आरोपी पळून जात असताना त्यापैकी वैभव व अविनाश यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले व इतर तीनजण पळून गेले.
या कारमधून लोखंडी कोयता, एक सुरा, एक लोखंडी रॉड, व प्रवीण ढाले नावाचे एटीएम कार्ड, पिवळ्या रंगाची खरी असलेली नंबर प्लेट (एम एच १४ सी एक्स २८१३), दारूच्या बाटल्या, मोबाईल, मास्क, असा २ लाख ८ हजार ४५० रुपये किंमतीचा माल मिळून आला. या गाडीच्या मालकाने गाडी वैभव यास दरमहा वीस हजार रुपये भाड्याने दिली होती. या गाडीत प्रवाशांना बसवून त्यांना कोयता व चाकूचा धाक दाखवून मारहाण करून लूटमार करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार हे पुढील तपास करीत आहेत.
यापूर्वी या आरोपींना मुकेश राठोड व त्यांची पत्नी यांना लिफ्ट देऊन पत्नीच्या गळ्यातील दागिने, मोबाईल असा ९८ हजाराचा माल चोरून नेल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. तसेच बिपीन कुमार दुबे (सध्या रा. भांबोली, ता.खेड, जि.पुणे ) व जितेंद्र शामलाल दोहारे (रा. लोणावळा, ता.मावळ, जि.पुणे) यांना गाडीत लिफ्ट देऊन त्यांचे एटीएम कार्ड घेऊन त्यांचा पिन नंबर घेऊन भोसरी, निगडी, मोशी या भागातून एटीएम सेंटरमधून रोख रक्कम जबरीने काढून घेतली. याचीही आरोपींनी कबुली दिली आहे.