दप्तराचे ओझे पाठीवर; दाद मागायची कोठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 03:26 AM2018-12-09T03:26:42+5:302018-12-09T03:27:05+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष; पालक-शिक्षक संघही उदासीन
खडकी : शासनादेशाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वय व इयत्तेप्रमाणे दप्तराचे ओझे असायला हवे. तसा आदेशही शिक्षण मंडळाने काढला आहे. मात्र खडकीतील आलेगावकर शाळा, जीएमआय शाळा, तसेच मुनोत बालवाडी-शिशुशाळा येथील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे व विद्यार्थ्यांचे वजन शाळा प्रशासनाने अद्यापपर्यंत केले नसल्याचे समोर आले आहे.
‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत खडकी शिक्षण संस्थेमधील कोणत्याही विद्यार्थ्याचे वजन व दप्तराचे वजन केले नसल्याची माहिती संस्थेच्या संचालकांकडून मिळाली आहे. लोकमत पाहणीच्या वेळेस संस्थेचे संचालक राजेंद्र भुतडा यांनी दहावीच्या एका विद्यार्थ्याचे तत्काळ वजन केले असता, विद्यार्थ्याचे वजन ३४.२० किलोग्रॅम व दप्तराचे वजन ५.२० किलोग्रॅम इतके भरले. दप्तरासह विद्यार्थ्याचे वजन ३९.१८० किलोग्रॅम होते. आम्ही लवकरच संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे व त्याच्या दप्तराचे वजन करून घेणार आहोत, असे भुतडा यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या दप्तराचे वजन झेपत नव्हते. शाळेतर्फे कसल्याही सूचना दिल्या नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. भुतडा यांनी सांगितले की, आम्ही शिक्षक-पालक बैठकीत पालकांना सूचना दिल्या आहेत.