मावळात लढत दुरंगी! अपक्ष बापू भेगडे आणि राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांच्यात फैसला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 10:12 PM2024-11-04T22:12:23+5:302024-11-04T22:12:38+5:30
मावळमधून विद्यमान आमदार सुनील शेळके महायुतीचे उमेदवार आहेत. शेळके राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे असून, त्यांना पक्षांतर्गत बापूसाहेब भेगडे यांचे तगडे आव्हान होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : मावळमध्ये विधानसभेसाठी एकूण १८ उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननी प्रक्रियेत सहा अर्ज बाद झाले होते. तर अर्ज माधारीच्या अंतिम दिवशी सहा जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे मावळच्या रिंगणात फक्त सहाच उमेदवार राहिले आहेत. बापू भेगडे यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
मावळमधून विद्यमान आमदार सुनील शेळके महायुतीचे उमेदवार आहेत. शेळके राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे असून, त्यांना पक्षांतर्गत बापूसाहेब भेगडे यांचे तगडे आव्हान होते. भेगडे यांची महामंडळावर वर्णी लावून त्यांच्या नावावर फुली मारल्याचे स्पष्ट झाले होते. पण, भेगडे यांनी महामंडळ नाकारून निवडणूक लढविणार असल्याची ठाम भूमिका घेतली. तसेच, अपक्ष निवडणूक लढव असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांना भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीनेही उमेदवार न देता पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शेळके यांच्यासमोर भेगडे यांचे तगडे आव्हान असणार आहे.
यांनी घेतली माघार....
विधान सुधीर तरफदार, दादासाहेब किसन यादव, रविंद्र आण्णासाहेब भेगडे, सुरेश्वरी मनोजकुमार ढोरे, रूपाली राजेंद्र बोचकरी, संतोष राजन लोखंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
मावळ विधानसभा:-
एकुण अर्ज - १८
बाद अर्ज - ०६
वैध अर्ज - १२
माघार - ०६
उमेदवार रिंगणात - ०६
पुरूष मतदार : १९६१८८
महिला मतदार : १८७१२७
इतर : १३
एकूण मतदार : ३८३३२८