दसऱ्याला कामगाराने लुटले मालकाच्या दुकानातील सोने; एक कोटीचे दागिने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 12:09 PM2021-10-16T12:09:31+5:302021-10-16T12:12:21+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जैन यांचे चिखली येथील कृष्णानगर चौकात श्री. महावीर ज्वेलर्स नावाचे दुकान आहे
पिंपरी : ज्वेलर्सच्या दुकानातून सेल्समनने एक कोटी १८ लाख ६६ हजार रुपये दागिने चोरून नेले. श्री. महावीर ज्वेलर्स, कोयनानगर, कृष्णानगर चौक, चिखली येथे शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. दसऱ्याच्या दिवशी कामगाराने त्याच्या मालकाच्या दुकानातील सोने लुटण्याच्या या प्रकाराने शहरात खळबळ उडाली.
मुकेश तिलोकराम सोलंकी (वय ३०, रा. मोरेवस्ती, चिखली, मुळगाव वोपारीगाव, ता. मारवाड जंक्शन, जि. पाली, राजस्थान), असे गुन्हा दाखल झालेल्या सेल्समनचे नाव आहे. जितेंद्र अशोक जैन (वय ३५, रा. निगडी) यांनी या प्रकरणी शनिवारी (दि. १६) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जैन यांचे चिखली येथील कृष्णानगर चौकात श्री. महावीर ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आरोपी मुकेश सोलंकी हा फिर्यादीच्या दुकानात सेल्समन होता. त्यामुळे फिर्यादीने आरोपी सोलंकी याच्याकडे ग्राहकांना दाखवण्यासाठी दागिने दिले होते. त्यातील १३९६ ग्रॅम सोन्याचे मिनी गंठण, ११०० ग्रॅम सोन्याचे नेकलेस व राणीहार असलेला बॉक्स, तसेच साक्षीदार थानाराम घिसाराम चौधरी यांनी दिलेली १० हजार रुपये किमतीची दुचाकी, असा एकूण एक कोटी १८ लाख ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपी सेल्समन मुकेश सोलंकी याने नजर चुकवून चोरी करून निघून गेला.