पिंपरीतील D.Y. पाटील रुग्णालय बाॅम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांची धावाधाव, शहरात खळबळ
By नारायण बडगुजर | Published: November 6, 2024 05:40 PM2024-11-06T17:40:15+5:302024-11-06T17:40:35+5:30
दहशतवादी संघटनांचा काही संबंध आहे का? ई-मेल कुठून आणि केला, धमकी कुणी कशासाठी दिली, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू
पिंपरी : रुग्णालयात ‘आयईडी’ (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोजिव डीवाइस) स्फोटके ठेवले असून रुग्णालय उडवून देऊ, अशा धमकी ई-मेलव्दारे देण्यात आली. पिंपरी येथील डाॅ. डी. वाय. पाटील रुग्णालयात बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे पोलिसांची धावाधाव होऊन शहरात खळबळ उडाली.
पिंपरी येथील संत तुकाराम नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गोरख कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील डाॅ. डी. वाय. पाटील रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या ई-मेल आयडीवर बुधवारी सकाळी एक ई-मेल प्राप्त झाला. दरम्यान, सकाळी ११.२५ वाजता संबंधित कर्मचाऱ्यांनी ई-मेल तपासला असता त्यात रुग्णालयात आयईडी बाॅम्ब ठेवल्याचे तसेच रुग्णालय उडवण्याचे नमूद केल्याचे निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळताच संत तुकाराम नगर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच बाॅम्ब शोधक व नाशक पथकास पाचारण करण्यात आले. पथकाकडून पाहणी करण्यात आली. मात्र, काहीही संशयास्पद आढळून आले नाही.
ई-मेल कुठून आणि कोणी केला होता, धमकी कशासाठी दिली, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. तसेच दहशतवादी संघटनांचा काही संबंध आहे का, याव्यतिरिक्त किती रुग्णालय किंवा अतर आस्थापनांना अशा प्रकारचा धमकीचा ई-मेल करण्यात आला आहे का, याबाबतही तपास केला जात आहे.
तीन महिन्यांपूर्वीही ई-मेलव्दारे धमकी
निगडी पोलिस ठाण्यातील धन्वंतरी रुग्णालयाला देखील ऑगस्ट महिन्यात अशीच धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला होता. रुग्णालयात बाॅम्ब ठेवला असून, रुग्णालय उडवून देण्यात येईल, अशी धमकी त्यातून दिली होती. एका दहशतवादी संघटनेचे नाव देखील त्यात नमूद केले होते. त्यापाठोपाठ पिंपरी येथील डी. वाय. पाटील रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाला ई-मेलवरून धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.