ई-पेमेंटच्या बोजवाऱ्याने विद्यार्थी बक्षिसांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 01:49 AM2019-03-07T01:49:28+5:302019-03-07T01:49:31+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोठा गाजावाजा करून दहावी आणि बारावीतील गुणवंतांना ६ कोटी ६ लाख ४० हजार रुपयांच्या बक्षिसांचे वाटप नुकतेच केले.
- विश्वास मोरे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोठा गाजावाजा करून दहावी आणि बारावीतील गुणवंतांना ६ कोटी ६ लाख ४० हजार रुपयांच्या बक्षिसांचे वाटप नुकतेच केले. जाहीर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ई-पेमेंट करण्यात आले. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याबद्दल पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नागरवस्ती विभागाचा गलथान कारभार उघडकीस आला असून, आॅनलाइन पेमेंटचे तीनतेरा वाजले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शाळांतील गुणवंत आणि शहराच्या हद्दीतील दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जातात. नागरवस्ती विभागाच्या कल्याणकारी योजनेंतर्गत बक्षिसे दिली जातात. यासाठी अर्ज मागविले जातात. अर्ज येऊन वर्ष झाले आहे. गेल्या वर्षीचे बक्षीस वितरण दुसऱ्या वर्षीच्या परीक्षेच्या वेळी झाले. चिंचवड येथे दोन दिवसांपूर्वी
मोठा गाजावाजा करून महापौर
राहुल जाधव यांच्या हस्ते ६ कोटी ६ लाख ४० हजार रुपयांच्या बक्षिसांचे वाटप केले.
केवळ मेसेज, पैसै नाहीच
ई पेमेंटद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे फोटोसेशनही केले. विद्यार्थ्यांना आपल्या खात्यात बक्षिसाची रक्कम जमा झाली आहे, असा एसएमएसही पाठविण्यात आला. मात्र, रक्कम जमा झालीच नाही. त्यामुळे नागरवस्ती विभागात पालकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर राहुल जाधव यांनाही पालकांनी दूरध्वनी करून छळले आहे.
महापौरांनाही विद्यार्थ्यांना रक्कम न मिळाल्याबाबत मनस्ताप सहन करावा लागत आहे. पालक आणि विद्यार्थी यांनी महापौरांकडे तक्रार केली आहे. महापौरांनी नागरवस्ती विभागाच्या सहायक आयुक्त स्मिता झगडे यांच्याकडे विचारणा केली. मनपाने बक्षीस वितरण कार्यक्रमातच ई पेमेंटद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले. मग ती रक्कम गेली कुठे, असा प्रश्न केला.
>दहावीच्या विद्यार्थ्यांना ४.५ कोटींची बक्षिसे
दहावीमधील ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या १३४० विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांप्रमाणे प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून दोन कोटी एक लाख रुपयांचे वितरण डिजिटल पेमेंटद्वारे करण्यात आले. इयत्ता १० वीमधील ८० ते ९० टक्क्यांपर्यंत गुण प्राप्त केलेल्या २६४१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार प्रमाणे प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून २ कोटी ६४ लाख १० हजारांची बक्षिसे देण्यात आली.
>बारावी विद्यार्थ्यांना ६ कोटींची बक्षिसे
महापालिकेतर्फे ४९२३ विद्यार्थ्यांना सहा कोटींची बक्षिसे इयत्ता १२ वीमधील विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या ९४२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजारप्रमाणे प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून १ कोटी ४१ लाख ३० हजार रुपयांचे वितरण डिजिटल पेमेंटद्वारे करण्यात आले. याप्रमाणे एकूण ४९२३ लाभार्थी विद्यार्थ्यांना एकूण रक्कम रुपये ६ कोटी ६ लाख ४० हजार फक्त इतकी प्रोत्साहनपर बक्षिसे डिजिटल पेमेंटद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली.
बक्षीस वितरण समारंभ झाल्यानंतर त्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, असा दावा प्रशासनाने केला होता. पालकांच्या तक्रारी येत आहे. एसएमएस आला; परंतु रक्कम जमा झाली नाही. पैसे गेले कोठे, असा प्रश्न उपस्थित होतो. नागरवस्ती विभागाने पालकांच्या तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. दर वर्षी बक्षीस वितरणास वेळ होतो. निकालानंतर महिनाभराच्या आतच बक्षीस वितरण करायला हवे. - राहुल जाधव, महापौर
डिजिटल पेमेंटद्वारे बक्षिसाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली आहे. डिजिटल पद्धतीने ही रक्कम विद्यार्थ्यांना दिली असली, तरी प्रत्यक्षात ही रक्कम जमा होण्यास आठवडाभराचा कालखंड जाणार आहे. त्यामुळे आठ दिवसात जर रक्कम जमा झाली नाही, तर नागरवस्ती विभागात संपर्क साधावा. पालकांच्या तक्रारींची दखल घेतली जाईल. नागरवस्ती विकास योजना विभागाकडून विशेष बाब म्हणून १००पैकी ९८ टक्के विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला.
- स्मिता झगडे, सहायक आयुक्त