जमीन खचली अन् ९६ तासांनंतर घरच्यांच्या संपर्कात; आसाम महापुरातील पर्यटकांची आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 11:52 AM2023-07-14T11:52:54+5:302023-07-14T11:53:22+5:30

गावातील स्थानिक नागरिकांना सोबत घेत शानगड-रोपा-सैंज व्हॅली-लार्जी असे तब्बल ४० किलोमीटर पायी चालत आलो

Earthquake and after 96 hours in contact with family Assam floods the fate of tourists | जमीन खचली अन् ९६ तासांनंतर घरच्यांच्या संपर्कात; आसाम महापुरातील पर्यटकांची आपबीती

जमीन खचली अन् ९६ तासांनंतर घरच्यांच्या संपर्कात; आसाम महापुरातील पर्यटकांची आपबीती

googlenewsNext

ज्ञानेश्वर भंडारे

पिंपरी : आसाममधील शानगडला फिरायला गेलो होतो. दोन दिवस संततधार पाऊस सुरू होता. रस्त्यावरील वाहने पाण्यात वाहत जात होती. दरडी कोसळत होत्या. काय होतंय हे समजायच्या आत मोबाईलचे नेटवर्क गेले. कुटुंबाशी संपर्क होईना. पाऊस थांबल्यानंतर पूर ओसरला तरीही रस्त्यावर दीड ते दोन फुटांपर्यंत चिखल साचला होता. मदत मिळवायची तर कशी, असा प्रश्न होता. मात्र, नशीब बलवत्तर त्यामुळे आम्ही सुखरूप आलो. अशी भावना आसामच्या महापुरात अडकलेल्या चिंचवड येथील प्रथमेश साखरे आणि कृष्णा भडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना बोलून दाखवली.

चिंचवड येथील प्रथमेश साखरे आणि कृष्णा भडके हे नोकरीनिमित्त चंडीगडला राहतात. तिथूनच जवळ असलेल्या शानगडला ते आपल्या ग्रुपसोबत फिरायला गेले. जाताना अगदी मस्त वातावरणाचा आनंद घेत ते मौज करत होते. शनिवारी, दि. ८ सकाळी अचानक पाऊस सुरू झाल्याने ते हॉटेलवरच थांबले. रविवारी मोबाईलची रेंज गेली. त्यानंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क तुटला. स्थानिक पोलिस स्टेशन दूर होते. तिथे पोहचण्याचे मार्गही बंद झाले होते. त्यामुळे त्यांना कोणाशी संपर्कही करता येत नव्हता.

गावकऱ्यांनी पायवाटेने आणले...

मंगळवारी पाऊस उघडल्यानंतर त्यांनी गावातील स्थानिकांशी भेटून माहिती घेतली. तेव्हा त्यांना दरडी कोसळल्याची माहिती कळली. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी वापस येण्याचा निर्णय घेतला. गावातील स्थानिक नागरिकांना सोबत घेत शानगड-रोपा-सैंज व्हॅली-लार्जी असे तब्बल चाळीस किलोमीटर पायी चालत आलो. रस्ते पूर्णत: वाहून गेले आहेत. तिथून वाहने भेटली. चंडीगडच्या जवळ आल्यानंतर कुटुंबाशी संपर्क केला. अर्ध्या रस्त्यापर्यंत शासनाची मदत पोहचली होती, असे प्रथमेश साखरे याने सांगितले.

पन्नास मीटरवर जमीन खचली...

आम्ही चंडीगडहून शानगडला फिरायला शुक्रवारी (दि. ७) रात्री निघालो. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी पोहोचलो. आम्ही जिथे थांबलो तिथून जवळच असलेली पर्यटनस्थळे पाहण्यासाठी गेलो. सकाळी दहाच्या दरम्यान संततधार पावसाला सुरुवात झाली. रविवारी मोबाईलचे नेटवर्क गेले. तिथून आमचा कुटुंबाशी व नातेवाइकांशी संपर्क तुटला. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. तिथून अगदी पन्नास मीटरवर जमीन खचली होती. तब्बल ९६ तासांनंतर मोबाईलला रेंज आली, असे कृष्णा भडके यांनी सांगितले.

Web Title: Earthquake and after 96 hours in contact with family Assam floods the fate of tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.