भूमिपूजनाचा लावला धडाका
By admin | Published: April 9, 2016 01:44 AM2016-04-09T01:44:55+5:302016-04-09T01:44:55+5:30
महापालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसने सध्या शहरात भूमिपूजन कार्यक्रमांचा धडाका लावला आहे.
पिंपरी : महापालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसने सध्या शहरात भूमिपूजन कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. यासाठी नेतेमंडळीही आठवड्यातून दोन-दोन वेळा शहरात दाखल होत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँगे्रसची एकहाती सत्ता आहे, तर सध्या राज्यात आणि केंद्रात भाजपा सत्तेत आहे. अशातच पुन्हा महापालिकेत सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादीची तयारी सुरू आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रस्तावित असलेल्या विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा सपाटा लावला आहे. पक्षांच्या नेत्यांमार्फत भूमिपूजन केले जात असून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शनिवारी, २ एप्रिलला शहरात आलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. भूमकर चौक ते शिवाजी चौक या रस्त्याचे भूमिपूजन, भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक या रस्त्यावरील निसर्गदर्शन सोसायटीजवळील रेल्वे लाइनवर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन, दळवीनगर येथील शाळा इमारतीचे भूमिपूजन, नाशिकफाटा उड्डाणपूल येथे पादचाऱ्यांसाठीच्या पुलाचे भूमिपूजन, बोपखेल फाटा ते आळंदी रस्ता विकसित करण्याच्या कामाचा प्रारंभ यांचा समावेश आहे. यानिमित्त पवार दिवसभर शहरातच होते. त्या वेळी त्यांनी प्रभाग अधिकाऱ्यांची नावे निश्चित केली होती. तसेच ७ एप्रिलला गुरुवारीदेखील अजित पवार यांनी शहरात हजेरी लावली. भोसरीतील संत ज्ञानेश्वर भाजी मंडई व व्यापारी संकुल इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. अशाप्रकारे पवार सहा दिवसांत दोनवेळा शहरात आले.
एरवी शहरात येण्यासाठी वेळ नसणारे नेते आता शहराला पुरेपूर वेळ देत आहेत. पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेत आहेत.(प्रतिनिधी)