नोटबंदीच्या चुकीच्या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था ढासळली : रत्नाकर महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 02:19 PM2017-11-07T14:19:47+5:302017-11-07T14:28:28+5:30
नोटबंदीच्या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था ढासळली, सामान्य नागरिकांचे जीवन त्रस्त केले आहे, त्यामुळे काँग्रेसतर्फे ८ नोव्हेंबर हा काळा दिन पाळला जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी दिली.
पिंपरी : आपल्याच मंत्री मंडळाला खोलीत कोंडून नोटबंदीचा निर्णय गत वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था ढासळली, सामान्य नागरिकांचे जीवन त्रस्त केले आहे, त्यामुळे काँग्रेसतर्फे ८ नोव्हेंबर हा काळा दिन पाळला जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली.
देशातील काळा पैसा बाहेर काढणार, कॅशलेस व्यवहारामुळे पारदर्शकता येईल, असे भाजपाने भासवले. कॅशलेससाठी नोटाबंदी केली. १००० रुपयांच्या नोटा रद्द करून २००० च्या नोटा कशासाठी काढल्या, याचे उत्तर या सरकारने दिलेले नाही. यूपीए सरकारच्या काळात सर्वात अधिक काळा पैसा बाहेर काढला होता.
नोटबंदीनंतर २ लाख कंपन्यांना टाळे लावले आहे, असे भाजपाने सांगितले. सरकारच्या वेबसाईटवर मात्र कंपन्यांची यादी टाकू शकले नाही, याचाच अर्थ त्यांची आकडेवारी फसवी आहे, शेतकर्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले, प्रत्यक्ष शेतकर्यांना त्याचा किती लाभ मिळाला, हे देशातील जनतेने पाहिले. शेतकरी, सामान्य जनता, उद्योजक, व्यापारी सर्वच या सरकारच्या कारभाराने त्रस्त आहेत. त्यामुळे काँग्रेसने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. बुधवारी सांगलीत या आंदोलनाचा समारोप होणार आहे.