‘त्या’ इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करा!
By admin | Published: December 22, 2015 01:15 AM2015-12-22T01:15:18+5:302015-12-22T01:15:18+5:30
पूर्णानगर येथील मीरा हाइट्सच्या इमारतीची तपासणी करण्याचे व स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा आदेश महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी दिला.
पिंपरी : पूर्णानगर येथील मीरा हाइट्सच्या इमारतीची तपासणी करण्याचे व स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा आदेश महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी दिला. सीमाभिंत पाडून ती पूर्णपणे नव्याने बांधण्याचा आदेशही बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आला. महापालिकेचे आयुक्त जाधव व प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांनी इमारतीची पाहणी केली. ही इमारत राहण्यायोग्य आहे का नाही, हे ठरविण्यात येणार आहे.
मातीचा भराव खचल्याने पूर्णानगर येथील मीरा हाइट्स या इमारतीची सीमाभिंत शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कोसळली. त्यामुळे इमारतीला धोका निर्माण झाला असून, प्राधिकरणाने रहिवाशांना घर खाली करण्यास सांगितले होते. या भागात खाणी व नाले बुजवून इमारती उभ्या केल्या आहेत. त्यामुळे जमीन खचण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. वर्षभरातील ही दुसरी घटना आहे. या इमारतीच्या तळात मुरमाऐवजी मातीचा भराव टाकला आहे. या इमारतीत १२ सदनिका आहेत. या वेळी प्राधिकरणाचे उपसंचालक एम. वाय. देवडे, धैर्यशील खैरे, नगरसेवक दत्ता साने व अजय सायकर उपस्थित होते.
चिखली, पूर्णानगर, शिवतेजनगर हा संपूर्णत: खाणी व नाल्यांचा परिसर आहे. बिल्डर लॉबीने प्राधिकरणाकडून जमिनी खरेदी केल्या. या खाणीत दगड, मातीचा भराव टाकून बहुमजली इमारती उभ्या केल्या. मातीच्या भरावामुळे जमीन खचून वारंवार अपघात होत आहेत. माती व दगडाच्या भरावावर उभारलेल्या इमारतींना भविष्यात धोका संभवू शकतो. पैसा जमा करून आयुष्याची पुंजी घरासाठी लावणाऱ्या रहिवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. येथील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्राधिकरणाने इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र देताना इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने असलेल्या सर्व बाजू तपासाव्यात. तसेच परिसरात आजही अशा इमारती उभारल्या जात असून, त्याबाबतही प्राधिकरणाने त्वरित निर्णय घ्यावा. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळता येतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे. अधिकारी बिल्डरधार्जिणे निर्णय का घेतात, पूर्णानगरसारख्या घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असे प्रश्न विचारले जात आहेत.(प्रतिनिधी)
उत्कृष्ट दर्जाचे काम केले, तर असे प्रकार घडणार नाहीत. पाया भक्कम नसेल आणि वर कितीही चांगले काम केले, तर त्याचा उपयोग नाही. सीमाभिंत ताबडतोब बांधून घेऊन इमारतीच्या पायाशी भर घालावी. इमारतीचे सांडपाणी बाहेर जाण्यासाठी वाट नाही. त्यासाठी वाट निर्माण करावी लागेल. या परिसरात जे मोकळे भूखंड आहेत. तेथे भराव टाकण्यात येणार आहे.
- सुरेश जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी