पाण्याचे आॅडिट करा

By admin | Published: April 16, 2017 04:03 AM2017-04-16T04:03:40+5:302017-04-16T04:03:40+5:30

पिंपरी-चिंचवड शहराला दररोज होणारा पाणीपुरवठा आणि प्रत्यक्षातील मागणीत मोठ्या प्रमाणात तफावत आहे. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे.

Edit the water | पाण्याचे आॅडिट करा

पाण्याचे आॅडिट करा

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला दररोज होणारा पाणीपुरवठा आणि प्रत्यक्षातील मागणीत मोठ्या प्रमाणात तफावत आहे. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निगडी सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्राला शुक्रवारी भेट दिली.
त्यांनी योजनांच्या सद्य:स्थितीची माहिती घेतली. पाणीबचत ही काळाची गरज असून, महापालिकेने स्वत:पासून सुरुवात करावी, मुख्यालय, वायसीएम रुग्णालय, काही सोसायट्यांचे वॉटर आॅडिट करावे. त्याच्या आधारे पाणी बचतीच्या उपाययोजनेच्या शिफारसी स्थायी समितीला सादर कराव्यात, असे आदेशही दिले. स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्यासोबत पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, प्रमोद ओंबासे उपस्थित होते.
पाण्याचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत नागरिकांनीच स्वत:हून पाण्याची बचत करण्याची आवश्यकता असल्याचे अधिकाऱ्यानी सांगितले. त्यानंतर अध्यक्षा सावळे म्हणाल्या, ‘‘नागरिकांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आधी महापालिकेने स्वत: पासून सुरुवात करण्याची गरज आहे. शहरातील पालिकेच्या आणि शासकीय इमारतींना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याचा हिशेब ठेवला जात नाही. त्यामुळे अशा इमारतींना पाण्याचा किती पुरवठा होतो, हे समजणे आवश्यक आहे. त्यासाठी पालिका मुख्यालय आणि वायसीएम रुग्णालय आणि काही मोजक्या सोसायट्यांचे वॉटर आॅडिट करावे. या वॉटर आॅडिटमधून महापालिका मुख्यालय, वायसीएम रुग्णालय आणि संबंधित सोसायट्यांना पाण्याचा किती पुरवठा होतो आणि प्रत्यक्षात आवश्यकता किती आहे, याची माहिती समोर येईल. पाणीबचत आणि काटकसर करण्यासाठी काय उपाययोजना राबविता येतील, याच्या शिफारसी तयार कराव्यात.’’
मावळ तालुक्यामध्ये काही गावामध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे मावळवासीयांची अवस्था धरणे उशाला आणि कोरड घशाला, अशी झाली आहे. शहर परिसरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत आहे. तसेच वॉशिंग सेंटर, वॉटर पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच बांधकामासाठीही मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जात आहे. ते बंद करावे, अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)

पाणीटंचाई : पर्यायी स्रोत उपलब्ध नाही
शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्यमुळे दिवसेंदिवस पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहेत. उन्हाळ्यात काही भागाला पाणीपुरवठा होतो, तर काही भागाला होत नाही, अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थिती पाण्याचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध होत नाहीत. शहरासाठी पवना धरणातून दररोज किती पाणी उचलावे, ते निश्चित झाले आहे; परंतु निश्चित झालेल्या पाण्यापेक्षा दररोज १०० दशलक्ष घनमीटर पाणी जास्त उचलतो. त्यासाठी महापालिका महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दंडही भरते. एवढे करूनही शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत दररोज दिले जाणारे पाणी अपुरेच आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला कायद्याने ठरलेले दरडोई पाणी देणे महापालिकेला शक्य होत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Edit the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.